Join us

कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:01 AM

नैसर्गिक संकटामुळे त्रस्त शेतकऱ्यांकडून कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञान आधार घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोनचा पर्याय समोर येत आहे.

नितीन शेळकेसध्याच्या काळात शेतकरीशेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. वेळ, श्रम आणि पैशाची बचत करून ड्रोनच्या माध्यमातून शेती पिकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.

ड्रोनच्या माध्यमातून एक एकर फवारणीसाठी केवळ ७ मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच औषध, पाणी आणि मनुष्यबळाची बचत होतेय नैसर्गिक संकटामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांकडून आता कमी कष्टात शेतीत दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे.

त्यासाठी ड्रोनच्या वापराचा पर्याय समोर येत आहे. आळे (ता. जुन्नर) परिसरातील लवणवाडी येथे शेतकऱ्याने पारंपारिक शेती अवजारांना फाटा देत पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून उसावर औषध फवारणी करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे.

ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरावर फवारणी होते त्यासोबतच कीटकनाशकाची बचतही होते. पेट्रोल पंपाने फवारणी केली असता एकरला बाराशे ते तेराशे रुपये खर्च येतो तर यामध्ये वेळ व कीटकनाशक खूप जातात.

परंतु ड्रोन मशिनद्वारे तणनाशक फवारणी केली असता एकरी फक्त आठशे रुपये खर्च येतो. ड्रोनद्वारे सोयाबिन, बाजरी, मूग, उडीद, गहू, हरभरा, तूर तसेच ऊस, मका व सर्व प्रकारच्या पिकांना फवारणी करता येत आहे.

ड्रोनद्वारे फवारणीसाठी मशिन इस्राईल या देशातून मागवली असून, पंधरा लाख रुपये त्याची किंमत असून, बॅटरीवर ते चालत असून दहा लिटर पाणी बसेल इतकी त्याची क्षमता आहे. ड्रोनद्वारे फवारणीकडे मशिन फवारणीसाठी सहज एकरी फक्त सातशे ते आठशे रुपये दराने उपलब्ध होत आहे.

कमी वेळेत जास्त क्षेत्रामध्ये फवारणी• सध्या यांत्रिकीकरणामुळे अनेक जटिल कार्य सोप्या पद्धतीने करता येणे शक्य झाले आहे. मोठ्या क्षेत्रावरील औषधांची फवारणी ड्रोनच्या मदतीने लवकरात लवकर व अधिक कार्यक्षमतेने ड्रोन मदतीने फवारणी केली जाते.• जी पिके जास्त वाढलेली असतात त्यामध्ये ड्रोनचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो जसे की ऊस, पेरू, आंबा, फळबाग कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रामध्ये फवारणी करणे हे ड्रोनचे मुख्य वैशिष्ट्य आहे तसेच ड्रोनच्या मदतीने पिकांवरील आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यानुसार वेळोवेळी औषध फवारणी केली जाऊ शकते.

सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून उसाला खते औषधे योग्य रीतीने दिल्यास एकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पन्न मिळते. ड्रोनद्वारे वाढलेल्या उसावर कीटकनाशक बुरशीनाशक व कांड्यांची वाढ होण्यासाठी इतर काही औषधे फवारणी घेतल्यास उत्पादन निश्चित वाढते. ड्रोनने फवारणी करण्यासाठी एकरी सातशे ते आठशे रुपये खर्च येतो. शेतात ड्रोन मशिनद्वारे तणनाशक फवारणी केल्याने दहा ते पंधरा हजार रुपयांची बचत होते. - बापू शंकर कुऱ्हाडे, शेतकरी

टॅग्स :शेतकरीशेतीपीकऊसजुन्नरखतेकीड व रोग नियंत्रण