Kanda Crop Management : रब्बी कांद्याची लागवड (Kanda Sowing) जोमात सुरु आहे. वातावरणातील बदल आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव (Onion Pest) झाल्याचे दिसून येत आहे. या किडींचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकऱ्यांना काळजी घेणे महत्वाचे असते. या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
फुलकिडे :
- कांद्यावर फुलकिडे, टाक्या किंवा मुरडा या किडींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो.
- पूर्ण वाढलेली कीड सुमारे 1 मि.मि. लांब असून त्यांचा रंग पिवळसर तपकिरी असतो व त्यांच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चटटे असतात.
- या किडीची मादी पानावर पांढ-या रंगाची 50-60 अंडी घालते.
- अंडी घालण्याचे प्रमाण दिवसाला 4-6 या प्रमाणे असते.
- अंडयातून 4-10 दिवसात पिल्ले बाहेर पडतात.
- पिल्ले आणि प्रौढ किटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसतात.
- असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होतात व वळतात.
- दिवसा ही कीड तापमान वाढल्यामुळे पानाच्या बेचक्यात खोलवर जाऊन बसते किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते.
- या किडीने केलेल्या जखमांमधुन करपा रोगाच्या जंतुंचा प्रसार होतो. त्यामुळे करपा रोगाचे प्रमाण वाढते.
- कोरडी हवा आणि 25- 30 अंश से. तापमान या किडीच्या वाढीस पोषक असते.
- या किडीमुळे कांद्याचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घटू शकते.
उपाययोजना
- पिकांची फेरपालट करावी.
- शेताच्या कडेने मका व गहू यांच्या दोन ओळीची लागवड करावी.
- लागवडीनंतर 30 दिवसांनी 65-70 टक्क्के आर्द्रता असतांना व्हर्टिसिलियम लेकॅनी 5 ग्रॅम / लि. पाण्यातून 8-10 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- चिकट सापळ्यांचा वापर करावा. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान 25 ई.सी. 20 मि.ली. /10 लि. या प्रमाणात द्रावण करून त्यात बुडवावीत व नंतर लागवड करावी.
- फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30% ईसी 15 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी 6 मिली + स्टीकर 10 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार आलटुन पालटुन फवारणी करावी.
- या पदधतीने शेतक-यांनी रब्बी कांद्याच्या रोग व किडींचे व्यवस्थापन केल्यास निश्चितच कांदयाचे उत्पादन वाढविण्यास मदत होईल.
- डॉ. राकेश सोनवणे,कांदा द्राक्ष संशोधन केंद्र,पिंपळगाव बसवंत, नाशिक