Join us

Agriculture News : रासायनिक खते वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान टाळा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:48 IST

Agriculture News : रासायनिक खते (Chemical fertilizers) वापरताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.

Agriculture News : रासायनिक खते (Chemical fertilizers) वापरताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. खते देताना, खतांची योग्य मात्रा आणि पद्धत वापरणे महत्त्वाचे आहे. तसेच, खतांचा त्वचेवर आणि डोळ्यांवर संपर्क टाळण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. 

  • सर्व नत्रयुक्त खतांची मात्रा एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. 
  • जमिनीत घातलेले नत्र हवेत उडून अधवा पाण्याबरोबर वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे.
  • खत पिकांच्या ओळीमधून अथवा रोपाभोवती द्यावे. रोपांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये.
  • खत ओलसर असल्यास खत कोरड्या मातीत किंवा रेतीत मिसळून वापरावे.
  • दोन चाड्याच्या पाभरीने खते पेरून द्यावीत. म्हणजे ती पिकांच्या मुळाच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन त्यांचा उपयोग होईल.
  • काही प्रमाणात नत्रयुक्त खते तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारी खते कमतरतेनुसार फवारणी करून देखील देतात.
  • पेरणीच्या वेळी खते व बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या सहाय्याने दिल्यास अधिक फायदेशीर ठरतात.
  • डायअमोनियम फॉस्फेट दोन टक्के (२०० ग्रॅम १० लिटर पाणी) फवारणी द्वारे दिल्यास फायद्याचे ठरते.
  • भात पिकास नायट्रेट खते देऊ नयेत. अन्नद्रव्याच्या कार्यक्षम वापरासाठी भात शेतीत नत्र व स्फुरदच्या गोळ्या (ब्रिकेट) हेक्टरी १६९ किलो देण्याची शिफारस आहे. ब्रिकेटमधून ५९ किलो नत्र + १ किलो स्फुरद प्रत्येक हेक्टरी मिळते. 
  • चुनखडीयुक्त जमिनीत युरिया / अमोनियम सल्फेट खते जमिनीच्या पृष्ठभागावरून देऊ नये.

तरी शेतकरी बंधूनी आपल्या शेतातील पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी वरीलप्रमाणे रासायनिक खते वापरताना घ्यावयाची काळजी जर आपण घेतली तर आपल्याला नक्कीच ती फायदेशीर ठरणारी बाब आहे.

- प्रवीण देशमुख, मुख्य गुणवत्ता निरीक्षक, कृषी आयुक्तालय पुणे

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीखतेखरीप