Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांतून एकदा माती नमुना तपासा; भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे होईल विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:58 IST

पल्लवी चिंचवडे यांचा शेतकऱ्यांना सल्ला

शेतजमिनीत पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्न घटकांची उपलब्धता किती प्रमाणात आहे, हे जाणून घेण्यासाठी मातीपरीक्षण आवश्यक आहे. यामुळे उत्पादकांना पिकांच्या पोषण व्यवस्थापनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत होते. मातीपरीक्षण केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळू शकते.

त्यामुळे पेरणीपूर्वी मातीपरीक्षण करूनच पेरणी करावी. नमुने तपासणीला पाठविताना शेतकऱ्याचे नाव, गट क्रमांक, याआधी घेतलेले पीक, नमुना गोळा केल्याचा दिनांक या गोष्टी पिशवीवर नमूद कराव्यात, असा सल्ला शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी दिला.

...असा घ्यावा परीक्षणासाठी नमुना

मातीपरीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना शेताच्या एकदम कडेने म्हणजेच अगदीच बांधाजवळून घेऊ नये. साधारणपणे १ ते १.५ मीटर अंतर सोडून नमुना गोळा करावा. माती नमुना कोणत्याही मोठ्या झाडाजवळून घेऊ नये.

शेतात जनावरे ज्या जागेवर बांधली जातात त्या ठिकाणावरून तसेच शेणाच्या उकिरड्याजवळून माती नमुना घेऊ नये. यासोबतच विहिरीजवळची जागा, दलदलीची जागा, कचरा टाकण्याची जागा या ठिकाणांवरून माती नमुना घेऊ नये. रासायनिक किवा सेंद्रिय खत टाकल्यानंतर किमान २ ते २.५ महिन्यांपर्यंत माती नमुना घेऊ नये.

तीन वर्षांतून एकदा माती नमुना तपासा

मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे विश्लेषण करण्यासाठी मातीपरीक्षण करणे महत्त्वाचे असते. खतांचा अधिक वापर केला तर जमिनीत रसायने अधिक मिसळली जातात, मातीचे जैविक आरोग्य धोक्यात आल्याने पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे घटक कमी होतात आणि माती नापीक होत जाते.

एका संशोधन रिपोर्टनुसार मातीपरीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. फळपिकांसाठी दरवर्षी तर हंगामी पिकांसाठी ३ वर्षातून एकदा माती नमुना तपासून घेणे गरजेचे असते.

मातीपरीक्षण कुठे करावे आणि खर्च किती येतो

कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र अशा खात्रीशीर ठिकाणावरूनच मातीपरीक्षण करून घ्यावे, मातीपरीक्षणाचा खर्च कोणते घटक तपासायचे आहेत, मातीचा प्रकार कोणता आहे यावर अवलंबून असतो. मातीतील महत्त्वाचे १२ घटक तपासण्यासाठी चांगल्या प्रयोगशाळेत ५०० ते ७०० रुपयांपर्यंत खर्च येतो.

प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घ्यावा

■ मातीचा नमुना घेताना त्या जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इत्यादी घटकांचा विचार करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात.

■ जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक याप्रमाणे एकरी ६ ते ७ ठिकाणांवरून नमुने गोळा केले जातात.

■ हंगामी पिकांसाठी २२.५ सेंटीमीटर खोलीचे 'व्ही' आकाराचे खड्डे घेतात, तर बहुवार्षिक पिकांसाठी ३०,६०,९० सेंटीमीटर खोलीचे इंग्रजी 'व्ही' आकाराचे खड्डे घेतात.

■ तीन वेगवेगळ्या खोलीचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठविले जातात. सर्व खड्यातील माती बाहेर काढून टाकून 'व्ही स्वाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घ्यावा.

■ शेतात पीक उभे असताना पिकाच्या दोन ओळींमधून नमुना घ्यावा, रब्बी हंगामातील पीक काढल्यानंतर साधारणपणे ८-१० दिवसांचा कालावधी गेल्यानंतर आणि नांगरणी, वखरणी करण्याअगोदर माती नमुना तपासणीसाठी गोळा करावा.

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :शेतीखतेसेंद्रिय खतपीक