Join us

भारतीय डाळिंबाने दिली कॅलिफोर्नियातील डाळिंबाला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:10 PM

अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भारतीय डाळिंब अमेकरिकेत दाखल झाले आहेत.

भारतीय डाळिंबांना अमेरिकेत जास्त मागणी आहे. अलिकडेच निर्यातबंदी उठविल्यानंतर आपल्याकडील डाळींब अमेरिकेच्या बाजारात दाखल झाले आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाचाबाजार हिस्सा वाढवण्यासाठी अपेडा, एन.पी.पी.ओ.,कृषी पणन मंडळ आणि निर्यातदार यांच्यामार्फत यु.एस.डी.ए. –अफिस यांच्या सहकार्याने महत्वाची पावले उचलत आहेत. अमेरिकेस भारतातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे डाळिंबाचा कंटेनर निर्यात करण्यात आल्याने ही एक महत्वाची मुहुर्तमेढ रोवली गेली असून डाळिंब उत्पादकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याची आवश्यकता पणन मंडळाचे अधिकारी बोलून दाखवित आहेत.

म्हणून भारतीय डाळिंब प्रसिद्धअमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. 

भारताच्या डाळिंबावर निर्यातबंदी का केली होती?सन 2017-2018 मध्ये डाळिंबाच्या दाण्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयातीस बंदी घातली होती. त्यामुळे गेली 5-6 वर्षे अमेरिकेस डाळिंब निर्यात होऊ शकली नाही. ही निर्यातबंदी उठविण्याबाबत अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. 

त्यानुसार सन 2022 पासून अमेरिकेने घातलेली निर्यात बंदी उठवली, मात्र त्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या. त्यामध्ये माईट वॉश, सोडियम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानकांनुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. 

असे झाले नियोजन त्यानुसार अपेडा, भारत सरकार, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेस डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. जुलै 2023 मध्ये प्रायोगिक तत्वावर डाळिंबाची पहिली शिपमेंट विमानमार्गे कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन रवाना करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाने डाळिंबाची आणखी एक शिपमेंट विमानमार्गे अमेरिकेला पाठवण्यात आली.

अमेरिकेचे निरीक्षक डॉ. लुईस हे कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावर डाळींब तपासणीसाठी जानेवारी ते मार्च 2024 या हंगामासाठी कार्यरत आहेत. पहिल्या समुद्रमार्गे डाळिंब कंटेनरसाठी प्रथम यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) यांच्या पॅकहाऊस येथे डाळिंबाची प्रतवारी करुन त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. 

त्यानंतर सदर डाळिंब 4 किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्यावर विकिरण सुविधा केंद्रात अमेरिकन इन्‍स्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ. यांच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण 4 हजार 258 बॉक्सेसमधून 14 मे. टन डाळिंबाचा कंटेनर दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी नाव्हा शेवा येथील जे.एन.पी.टी. वरुन समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी रवाना करण्यात आला.

टॅग्स :डाळिंबअमेरिकाकॅलिफोर्नियाशेतकरीबाजार