Join us

हळद तीनशेंनी 'उजळली'; सोयाबीनचे दर स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 2:21 PM

ज्या व्यापाऱ्यांनी हळद चढ्या दरात खरेदी केली, ते भाव कोसळल्यामुळे अडचणीत आले आहेत.

हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात १८ डिसेंबर रोजी हळदीचा भाव जवळपास तीनशे रुपयांनी वधारला. तर सोयाबीन मात्र मागील पंधरवड्यापासून स्थिर आहे.

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात १८ डिसेंबर रोजी ८०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ११ हजार ३०० ते १३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर सरासरी १२ हजार ३५० रुपये भाव राहिला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हळदीला सरासरी १४ ते १५ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. त्यानंतर ऑक्टोबरपासून भावात जवळपास क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी घसरण झाली. ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने हळद विक्रीविना ठेवली होती. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी हळद चढ्या दरात खरेदी केली, ते भाव कोसळल्यामुळे अडचणीत आले आहेत.

१८ डिसेंबर रोजी जवळपास तीनशे रुपयांनी भाव वधारले असले तरी अडीच महिन्यांपूर्वीच्या तुलनेत भावात वाढ होण्याची प्रतीक्षा आहे. तर सोयाबीनचे दर मात्र स्थिर आहेत. पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा भाव ५ हजार २०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यानंतर चार दिवसांतच भाव गडगडले. सध्या सरासरी ४ हजार ७५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सोयाबीन पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

एक हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला...

हिंगोली येथील मोंढ्यात सोमवारी जवळपास एक हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. ४ हजार ५६० ते ४ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.  सोयाबीनचे दर वाढण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु, नोव्हेंबरच्या सुरुवातीचे चार दिवस वगळता मागील वर्षभरापासून सोयाबीन पडत्या भावात विक्री करावे लागत आहे.

  •  काही शेतकऱ्यांनी तर भाववाढीच्या प्रतीक्षेत गेल्या वर्षीचे सोयाबीन विक्रीविना ठेवले होते. भावात मात्र वाढ झाली नसल्याने ते आता पडत्या भावात विक्री करण्याची वेळ आली आहे.
  • गेल्या वर्षभरापासून तुरीने भाव खाल्ला, मध्यंतरी तुरीने ११ हजारांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण झाली.
  • सध्या सरासरी ८ हजार रुपये क्विंटलने तूर विक्री होत आहे. परंतु, मोंड्यात आवक होत नसल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती हरभऱ्याची आहे.
  • रब्बीची पेरणी आटोपल्यानंतर शिल्लक राहिलेला हरभरा मोंढ्यात विक्रीसाठी येत होता. त्यामुळे आवक वाढली होती. आता मात्र, आवक अत्यल्प होत असल्याचे चित्र आहे. सध्या हरभऱ्याला सरासरी ५ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे
टॅग्स :बाजारसोयाबीनमार्केट यार्ड