Join us

हिंगोलीच्या मोंढ्यात हरभऱ्याची आवक वाढती; भाव ही समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 1:48 PM

निवडणुकीमुळे आज पासून काही दिवस मार्केट बंद

हिंगोली येथील मोंढ्यात हरभऱ्याला सध्या समाधानकारक भाव मिळत असल्याने आवक वाढली आहे. २५. एप्रिल रोजी तब्बल एक हजार १०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. सरासरी ५ हजार ८७५ रुपये भाव मिळाला.

दरवर्षी रब्बी हंगामात हरभन्ऱ्यापेक्षा गव्हाचा पेरा अधिक होतो. यंदा मात्र गव्हाऐवजी शेतकऱ्यांनी हरभन्ऱ्याला पसंती दिली. ३६ हजार ४६ हेक्टरवर गव्हाचा पैरा झाला होता. तर, तब्बल १ लाख ५६ हजार ७५० हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली होती. परंतु, जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या अवकाळीच्या मार्‍यामुळे हरभऱ्याला फटका बसला. मात्र, पेरा अधिक असल्यामुळे जिल्ह्यात हरभऱ्याचे उत्पादन गव्हापेक्षा जास्त झाले.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहे. परंतु, आणखी भाव वाढण्याच्या आशेमुळे हरभरा विक्रीविना ठेवला. परंतु, जवळपास हरभरा तयार होऊन जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटला. परंतु, भाव स्थिर आहेत. त्यामुळे आता शेतकरी हरभरा विक्रीसाठी आणत आहेत.

परिणामी, मोंढ्यात आवक वाढली आहे. गुरुवारी तब्बल एक हजार १०० क्विंटलची आवक झाली होती. किमान ५ हजार ६५० ते जास्तीत जास्त ६ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलने हरभरा विक्री झाला, तर, सरासरी ५ हजार ८७५ रुपये भाव मिळाला, तर सोयाबीनचे भाव मात्र कायम पड़ते राहत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

मतदान प्रक्रियेमुळे हळद मार्केट यार्ड बंद

■ येथील बाजार समिती कार्यालयात लोकसभा निवडणुकीचे दोन बूथ असल्यामुळे संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

■ या मार्केट यार्डात २९ एप्रिलपासून व्यवहार सुरू होणार आहेत. दरम्यान, नाणेटंचाईमुळे २२ एप्रिलपासून तीन दिवस हळदीची खरेदी-विक्री बंद ठेवली होती.

■ तर, २५ एप्रिलपासून मतदान प्रक्रियेमुळे व्यवहार बंद आहेत.

टॅग्स :बाजारहिंगोलीशेतीशेतकरी