Join us

सोयाबीन पाठोपाठ पांढऱ्या सोन्यानेही केली निराशा; शेतकरी पीक बदलण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 11:17 AM

शेतकरी सापडला आर्थिक संकटात : येत्या खरिपात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची यंदा कवडीमोल दरात विक्री करावी लागल्याने शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही. अशीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचीही झाली. ७ हजारांवर दर गेला नसल्याने पदरी निराशा आली. त्यामुळे येणाऱ्या खरिपात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता जाणकार शेतकरी वर्तवित आहेत.

यावर्षीचा खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. मागीलवर्षी जून महिन्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांचे तर अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. असे असताना शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला असून खरीपपूर्व मशागतीच्या कार्माना वेग आला आहे.

पण, म्हणावा तसा यंदा कापसाचा पेरा होईल की नाही हे मात्र कळायला मार्ग नाही. असे असले तरी कोणती पिके घ्यावी, याबाबत शेतकरी आतापासूनच संभ्रमात पडले आहेत. त्यासाठी खरीप हंगामाचे नियोजन करताना दिसत आहेत.

गतवर्षी घटलेले उत्पादन लक्षात घेता कापसाला किमान दहा हजारांचा भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने येत्या खरीप हंगामात कपसाच्या क्षेत्रात घट येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विहिरीतील पाण्यावर २५ मेपासून कापसाची लागवड करण्यास शेतकरी सुरुवात करणार असे दिसते. एप्रिलमध्ये अवकाळीने वादळीवाऱ्यासह कहर केला होता.

त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गतवर्षीसारखा जर मान्सूनचा सुरुवातीला खंड पडला तर कापसाच्या उत्पादनात घट होईल. त्यामुळे इतर पीक घेतलेले बरे असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे. यंदा कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता जाणकार शेतकरी वर्तवित आहेत.

लागवड खर्च वाढला, दर शेवटपर्यंत वाढलेच नाही

कापसाच्या उत्पादनासाठी फवारणी, स्वत, निंदणी, खुरपणी आदी लागवड खर्च वाढला आहे. अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही. यावर्षी सात हजार पुढे दर गेले नाहीत. उत्पन्न घटले, समाधानकारक दरही मिळाला नाही. त्यामुळे कापसाची तीन एकरऐवजी एक एकरवर लागवड करणार आहे. - बालाजी दळवी, शेतकरी वसमत जि. हिंगोली. 

कापसाला लागवड खर्च मोठ्या प्रमाणात लागला होता. परंतु, एकरी चार क्चिटल कापूस निघाला. यामुळे मोठा फटका बसला. दरवाढीची आशा होती. परंतु, ती आशाच राहिली. कपाशीचे क्षेत्र कमी करत दुसरे पीक घेतलेले बरे. - संजय इंगोले, शेतकरी वसमत जि. हिंगोली.

मे महिन्यात उन्हाचा पारा ४१ वर जात आहे. त्यामुळे मे अखेर कापसाची लागवड करणे चुकीचे ठरेल. जून महिन्यात पावसाचा अंदाज पाहून कापसाची लागवड केलेली बरी ठरेल. त्यामुळे मे अखेरऐवजी कापसाची लागवड जूनमध्ये करणार आहे. यावर्षी दर समाधानकारक मिळाले नाही. त्यामुळे पाच बॅगऐवजी दोन बॅगची पेरणी करणार आहे. - हाजी गणी शेख, शेतकरी वसमत जि. हिंगोली.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :बाजारकापूससोयाबीनशेतीशेतकरीपीक