Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात सोयाबीनला भाव कमीच; चांगल्या दराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2023 16:22 IST

सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, पण अतिवृष्टीनंतर सोयाबीन काळे पडले आणि त्याचे भाव घसरले

सोयाबीनला दोन वर्षांपूर्वी चांगला दर मिळाला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत गेली. पण, मागील आठ महिन्यांपासून दर कमी मिळत आहे. सध्या तर सोयाबीनला क्विंटलला ४७००  रुपयांपर्यंत भाव आहे. त्यामुळे चांगला दर मिळण्यासाठी सोयाबीन घरात होते. आणखी किती दिवस ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. कारण, जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे सुमारे ३ लाख हेक्टर आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे ६८ हजार हेक्टर निश्चित करण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले होते. याला कारण म्हणजे सोयाबीनला दोन वर्षांपासून चांगला भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला. पण गेल्यावर्षी काढणीच्या वेळीच दरात घसरण झाली. त्यातच अतिवृष्टीत सोयाबीनचे नुकसान झाले. यामुळे सोयाबीन काळे पडले. बाजारात काळ्या सोयाबीनला दर पाडून मागत आहेत. 

सातारा जिल्ह्यात ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर वाढला. साडेपाच हजारांवर दर गेला. पण, त्यानंतर दरात घसरण झाली. पाच हजारांच्या खाली दर आला. गेले काही महिने आहे. सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे दराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता काय करायचे असा प्रश्न पडलेला आहे.

उन्हाळ्यातही लागवड 

सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने सातारा जिल्ह्यात शेतकरी वर्षातून दोनवेळा पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक घेतले होते. तसेच त्यापूर्वी उन्हाळ्यातही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेतले होते. गेल्यावर्षी उन्हाळ्यात जवळपास १,६०० हेक्टरवर सोयाबीन क्षेत्र होते. 

तुरीला सोयाबीनपेक्षा जास्त दर

सध्या बाजारपेठेत तुरीला चांगला दर मिळत आहे. विदर्भात क्विंटलला १० हजारापर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकरी मालामाल होत आहे. पण, सातारा जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र एकदम अत्यल्प आहे. यंदाच्या खरीप हंगामात अवघे १७५ हेक्टर क्षेत्रावर तूर होईल असा अंदाज आहे. तर सातारा बाजार समितीत तुरीला क्विंटलला ६ ते ७ हजार दर मिळत आहे. 

टॅग्स :खरीपमार्केट यार्डशेतीमोसमी पाऊस