Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shetmal Market Update : ज्वारीला भाव, आंब्याची धमाकेदार एन्ट्री; बाजारात काय चाललंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:35 IST

Shetmal Market Update : उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात मोठी हालचाल सुरू झाली आहे. ज्वारीच्या दरात तेजी आली असून त्याचवेळी फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. एकीकडे ज्वारीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना, दुसरीकडे इतर पिकांच्या दरातील चढ-उतारामुळे बाजाराचे चित्र मिश्र दिसत आहे. नेमके कोणते दर वाढले आणि कोणते घसरले? जाणून घ्या सविस्तर(Shetmal Market Update)

संजय लव्हाडे

उन्हाळ्याची सुरुवात होताच बाजारपेठेत हालचालींना वेग आला आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा बाजारात दाखल झाला असून कृषी व सराफा बाजारात दरांचे चित्र मिश्र दिसत आहे.(Shetmal Market Update)

ज्वारीच्या दरात तेजी आली असताना सोयाबीन, तूर आणि खाद्यतेलांच्या दरात नरमाई दिसून येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने गहू व साखरेच्या निर्यातीला परवानगी दिल्याने साखरेच्या दरात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(Shetmal Market Update)

आंब्याची बाजारात एन्ट्री

अतिवृष्टीमुळे यंदा आंब्याचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी जालना बाजारपेठेत आंबा वेळेवर दाखल झाला आहे. 

लालबाग, केशर, शाही गुलाब या जातींची आवक सुरू झाली असून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

स्थानिक आंब्याचे दर २०० ते ३०० रुपये प्रति किलो

हापूस आंबा ७०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मागणी वाढल्याने दरात चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ज्वारीला तेजी; ६०० पोत्यांची आवक

जालना कृषी उत्पन्न बाजारात ज्वारीची आवक सुमारे ६०० पोती झाली असून दर २,१०० ते ४,६०० रुपये प्रति क्विंटल आहेत. वाढती मागणी आणि मर्यादित आवक यामुळे ज्वारीच्या दरात तेजी कायम आहे.

इतर पिकांचे दर पुढीलप्रमाणे 

पिकदर (रु./क्विंटल)
गहू२,३०० ते ५,०००
बाजरी३,००० ते ३,१५०
मका१,३५० ते १,७००
तूर७,१०० ते ८,३००
हरभरा४,००० ते ५,३५०

सोयाबीनमध्ये घसरण; दोन दिवसांत सुधारणा

अमेरिकेसोबतच्या कराराचा परिणाम आणि बाजारातील घडामोडींमुळे आडत बाजारात आठवडाभरात सोयाबीनचे दर क्विंटलमागे सुमारे ६०० रुपयांनी घसरले. या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

मात्र, मागील दोन दिवसांत सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली असून सध्या जालना बाजारात आवक २ हजार पोती इतकी आहे. दर ४,७०० ते ५,७०० रुपये प्रति क्विंटल आहेत.

सोने-चांदीत अस्थिरता

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर काही दिवस तेजी होती; मात्र अलीकडे दरात घट झाली आहे.

सोन्याचा दर सुमारे १,५६,००० रुपये प्रति तोळा

चांदीचा दर सुमारे २,५०,००० रुपये प्रति किलो

दरातील चढ-उतारामुळे गुंतवणूकदार व ग्राहक सावध पवित्रा घेत आहेत.

बाजारातील चित्र

जालना बाजारपेठेत सध्या दरांचे चित्र संमिश्र आहे. आंब्यामुळे बाजारात उत्साह असला तरी सोयाबीन-तूर नरमल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

ज्वारीच्या तेजीतून काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी दरातील अस्थिरता कायम असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष बाजारातील घडामोडींवर आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kanda Market : रक्ताचं पाणी करून कांदा पिकवला… पण मातीच्या भावाने विकला

अधिक वाचा : Goshala : गोसेवा आयोगासाठी १२२ कोटींची तरतूद; गोशाळांना स्वावलंबनाचा नवा मार्ग

English
हिंदी सारांश
Web Title : Jowar prices rise, mangoes arrive: Shetmal market update.

Web Summary : Jowar prices surge in Shetmal, while mangoes make a grand entry. Soybeans and tur prices decline. Market sees mixed trends amid fluctuating rates.
टॅग्स :शेती क्षेत्रआंबाज्वारीसोयाबीनगहूहरभरातूर