Join us

Sericulture Market : भावच मिळेना! रेशीम कोशाची साठवणूक वाढली, काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:28 IST

टसर रेशीम कोशाचे दर निम्म्याने घटले असल्याने उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले आहे.

गडचिरोली  : टसर रेशीम कोशाचे दर निम्म्याने घटले असल्याने उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडधा परिसरातील शेतकऱ्यांकडे १६ लाख कोश पडून आहेत. काही दिवसांत त्याची विक्री न झाल्यास त्यातून पुन्हा फुलपाखरू बाहेर पडून ते संपूर्ण कोश निकामी होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनाने हमीभावाने कोशाची खरेदी करावी, अशी मागणी कोश उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात ढिवर समाज हा बऱ्याचपैकी आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून मागासलेला आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मासेमारी व्यवसाय तसेच टसर कोश उत्पादन घेत असतात. परंतु यावर्षी कोशाला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे -आरमोरी तालुक्यातील वडधा, बोरीचक, सूर्यडोंगरी आदी गावातील १०० शेतकऱ्यांचे १६ लाख कोश त्यांच्या घरीच पडून आहेत. परिणामी त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. कोशामधील अळी ही जिवंत असते. ती बाहेर पडून कोश फुटल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणार आहे. त्यामुळे शासनाने हमी भाव देण्याची या रेशीम कोश उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा भाव

मागील वर्षी २० हजार रुपये खंडी (चार हजार कोश) दराने कोश विकण्यात आले. यावर्षी मात्र १० हजार रुपये खंडी दराने व्यापारी कोश मागत आहेत, एवढ्या दराने विक्री केल्यास उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाने हमीभावाने कोशाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अशी केली जाते टसर रेशीम शेती

सर्वप्रथम शेतकरी कोशातून बाहेर निघालेल्या अळीचे पंख छाटतात. त्यामुळे ती उडून जाऊ शकत नाही. तिला एका टोपल्यात ठेवले जाते. त्या ठिकाणी ती अंडी देते. काही दिवसानंतर अंड्यांमधून अळी बाहेर पडते. या अळीला येनाच्या झाडावर ठेवले जाते. येनाच्या झाडाचा पाला रेशीम अळीला आवडत असल्याने याच झाडांवर रेशीम अळी सोडली जाते. काही दिवसांनी ती स्वतः सभोवताल कोश तयार करून या कोशात ती सुप्तावस्थेत जाते. काही दिवसानंतर बाहेर पडून अंडी देते.

तर कवडीमोल दराने विकावे लागेल कोश

शेतकऱ्यांकडे आता उपलब्ध असलेला कोश हा जानेवारी महिन्यातील आहे. सध्या उन्हाळा असल्याने कोश अळी सुप्तावस्थेत आहे. मात्र पाऊस पडून थोडे तापमान कमी झाल्यास कोशातून फुलपाखरू बाहेर पडण्याचा धोक आहे. फुलपाखरू बाहेर पडल्यास व्यापारी कवडीमोल दराने कोशाच खरेदी करतात. जवळपास २५ टक्केच किंमत देतात. परिणामी कोश उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कोश ही नाशवंत वस्तू आहे. ती जास्त दिवस साठवून ठेवली जाऊ शकत नाही. त्यातुन फुलपाखरू बाहेर पडल्यास त्याची व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करतात. शासन कोश खरेदी करेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 

सुखदेव मेश्राम, बोरीचक

असे आहेत मागील पाच दिवसांचे दर

मागील पाच दिवसांचे दर पाहिले असता पणन मंडळाच्या माहितीनुसार जालना बाजार समितीत 22 एप्रिल रोजी क्विंटलला सरासरी 43 हजार 500 रुपये, 23 एप्रिल रोजी 47 हजार 500 रुपये, 24 एप्रिल रोजी 39 हजार रुपये, 25 एप्रिल रोजी 41 हजार रुपये तर 27 एप्रिल रोजी 37 हजार 500 रुपये दर मिळाला. म्हणजेच मागील पाचच दिवसात 06 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

टॅग्स :शेतीरेशीमशेतीगडचिरोलीशेती क्षेत्र