Join us

Summer Special : आजही गावरान आंब्याला पसंती का दिली जाते? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 2:54 PM

यंदा गावरान आंब्याचे भाव महागणार असल्याने जपूनच आंब्याची चव चाखावी लागणार आहे.

गडचिरोली : उन्हाळा आला की आंब्याची चव केव्हा एखदा चाखतो असे होते. सामान्यपणे अक्षयतृतीयापासून आंब्याच्या आमरसाचा आस्वाद घेतला जातो. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या काही वर्षांपासून गावरान आंबा दुर्मिळ होत आहे. यंदा गावरान आंब्याची चव चाखणे कठीण जरी असले तरी गावरान आंब्याचे भाव महागणार असल्याने जपूनच आंब्याची चव चाखावी लागणार आहे.

सध्या बाजारपेठेत वेगवेगळ्या संकरित वाणाचे आंबे येणे सुरू झाले असले तरी गावरान आंब्याची चव मात्र चाखने अधिक पसंत करतात. त्यामुळे गावरान आंब्याला बाजारपेठेत अधिक मागणी सुद्धा असते. शेतशिवरात मोठ्या कष्टाने देखरेख करून आंब्याची झाडे वाढविली असतात. मात्र सरपणासाठी पाच दशकांपूर्वी असलेले आंब्याचे झाड आज मात्र दिसून येत नाही. तसेच वातावरणाचा सुद्धा लागवडीवर परिणाम झालेला दिसून येत असताना मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. लंगडा, दशहरी या आंब्याच्या प्रमुख जाती ग्रामीण भागात दिसून येत असतात. 

बदलत्या काळानुसार आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर अधिक होत असल्याने आंब्याची चव बदलली असल्याचे दिसून येत आहे. आंबे खरेदी करताना ग्राहक मागे पुढे करतात. माञ नैसर्गिक रित्या झाडावरच पिकलेल्या आंब्याला बाजारपेठेत अधिक मागणी असते. मात्र पाड येईपर्यंत वाट पहावी लागत असते. त्यांनंतर गावरान आंब्याची मोठी आवक बाजारात येत असते. सद्यस्थितीत गावरान आंब्याला बहार तर काही भागात छोट्या छोट्या कैऱ्या आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंबे झाडावर दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावरान आंब्याची चव चाखायची असेल तर अजून महिनाभर तरी वाट पहावी लागणार आहे.

संकरीत आंब्यांमुळे गावरान आंब्यांची मागणी घटली 

संकरीत आंब्यांमुळे गावरान आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतातील मोठमोठी आंब्याची झाडे तोडत आहेत. गावागावात असलेल्या आमराया नष्ट झाल्या आहेत. गावातील नागरिकही आता संकरीत आंबे खरेदी करतात. गावरान आंब्यांची झाडे येत्या काही वर्षांमध्ये नष्ट होतील, असे कळमगाव येथील शेतकरी अशोक तुंबळे यांनी सांगितले.

इतर आंबा बाजारभाव कसे? 

सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये हापूससह लोकल आणि सर्वसाधारण आंब्याची आवक होत असते. हापूसला मुंबई फ्रुट मार्केट मध्ये सर्वाधिक 22500 रुपये क्विंटलचा भाव मिळतो आहे. तर याच मार्केटमध्ये लोकल आंब्याला क्विंटलमागे सरासरी 3000 रुपयांचा दर मिळतोय. छत्रपती संभाजीनगर    बाजार समितीत सर्वसाधारण आंब्याला सरासरी 12000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीआंबामार्केट यार्डगडचिरोली