Join us

आजपासून डाळींच्या साठ्यांवर पोर्टलद्वारे निगराणी, व्यापाऱ्यांना करावी लागणार नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 5:06 PM

आजपासून डाळींच्या साठ्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

आजपासून डाळींच्या साठ्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ज्या माध्यमातून डाळींचे आयातदार आणि व्यापाऱ्यांना दर आठवड्याला आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्यांसह डाळींचा साठा अचूकपणे घोषित करावा लागणार आहे. यासाठी पोर्टलच्या माध्यमातून ही नोंद ठेवली जाणार आहे. 

सद्यस्थितीत डाळींचे भाव वधारले असून डाळींचा अचूक साठा असावा यासाठी ही देखरेख सुरु करण्यात आली आहे. याबाबत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी आणि आयात-संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी डाळी उद्योगातील भागधारकांसोबत अनेक बैठका घेतल्या. याच बैठकांदरम्यान, विविध बाजारातील व्यापाऱ्यांकडे असलेल्या साठ्याच्या स्थितीबाबत मार्केट इंटेलिजन्स स्त्रोतांकडून मिळालेल्या इनपुटवरही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर डाळींचा फॉरवर्ड ट्रेड म्हणजे वायदा व्यापार करणाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यान्तर्गत कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

या बैठकीत म्यानमारमधून डाळींच्या आयातीबाबतही चर्चा झाली. यानुसार म्यानमारमधील सुधारित विनिमय दर आणि तेथील आयातदारांनी केलेली साठेबाजी या पार्श्वभूमीवर, म्यानमारमधून होणाऱ्या डाळींच्या आयातीसंबंधीच्या अडचणी- उदा. आयात किंमती इ. अशा अडचणींविषयी त्यांनी यांगूनमधील भारतीय मिशनशी चर्चा केली. 25 जानेवारी 2024 पासून रुपया - क्यात विनिमय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती भारतीय मिशनने दिली. व्यापार आणि व्यवहार सोपे आणि अधिक कार्यक्षम करण्याचा उद्देश त्यामागे आहे.

ही यंत्रणा कुणासाठी ?

ही नवी यंत्रणा सागरी व्यापार आणि सीमापार व्यापार दोन्हींसाठी आणि वस्तू व सेवा दोन्हींतील व्यापारासाठी लागू असेल. व्यापाऱ्यांनी ही यंत्रणा स्वीकारल्यास चलनाच्या रुपान्तरणावरील खर्च कमी होईल आणि विनिमय दराशी संबंधित गुंतागुंती दूर होतील. कारण मुळात, विविध चलनांच्या रुपान्तरणांचीच गरज पडणार नाही. व्यापारी समुदायांमध्ये - विशेषतः डाळ आयातदारांमध्ये- ही यंत्रणा कार्यान्वित केल्याबद्दलची माहिती वितरित करण्यासाठी वेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून SRVA द्वारे रुपया - क्यात थेट भरणा व्यवस्था वापरण्याची विनंती त्यांना करण्यात येत आहे. आयातदार आणि या उद्योगातील अन्य हितधारक- जसे की गिरणीमालक, साठेदार, किरकोळ व्यापारी इत्यादी- यांनी त्यांच्याकडील डाळींचे- आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्यासह- साठे  प्रामाणिकपणे घोषित करावेत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. 

इथे करावी लागणार नोंदणी 

दरम्यान आजपासून म्हणजेच 15 एप्रिल 2024 पासून त्यांनी दर आठवड्याला https://fcainfoweb.nic.in/psp/  या संकेतस्थळावर ते साठे घोषित करायचे आहेत. सर्व साठेदार घटकांनी साठे घोषित करण्याची खबरदारी घेण्याच्या आणि त्यांनी घोषित केलेले साठे पडताळून बघण्याच्या सूचना राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या बंदरांवरील गोदामांमधील तसेच डाळ उद्योगांच्या केंद्रामधील साठेदेखील वेळोवेळी तपासून बघितले पाहिजेत आणि साठेबाजी करून साठा जाहीर करण्याच्या संकेतस्थळावर खोटी माहिती भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.

टॅग्स :शेतीकेंद्र सरकारतुराशेतकरी