Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dalimb Export : डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना, 17 हजार किलो डाळिंबाची निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:10 IST

Dalimb Export : डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजनकृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी यावेळी चालू 2025-26 हंगामात अमेरिकेस सुमारे 300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. अमेरिकेतील बाजारपेठेत डाळिंबाची मागणी झपाट्याने वाढत असून, तेथील डाळिंब बाजारपेठ सध्या अंदाजे 1.2 ते 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. विशेषतः भारतीय ‘भगवा’ व ‘सुपर भगवा’ जातींना चव, रंग व साखर-आम्ल संतुलनामुळे अधिक मागणी आहे.

2017-18 मध्ये काही तांत्रिक कारणामुळे अमेरिकेला भारतातून डाळिंब निर्यात बंद झाली होती. परिणामी जवळपास सहा वर्षे भारतीय डाळिंब अमेरिकन बाजारपेठेत पोहोचू शकला नव्हता. निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या अपेडा व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी (यू.एस.डी.ए.) तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सातत्याने चर्चा केल्या. 

तसेच कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर आवश्यक चाचण्या घेऊन अहवाल सादर केले.  पॅक-हाऊसमध्ये डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली. त्यानंतर यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर विकिरण प्रक्रिया पार पाडण्यात आली. 4,800 बॉक्सेसमधून 17,616 किलो (सुमारे 17.6 मेट्रिक टन) डाळिंब निर्यात करण्यात आली आहे.

सुविधा केंद्रात विकिरण प्रक्रिया

सन 2024 मध्ये अमेरिकेने निर्यातीसाठी काही शास्त्रीय निकष लागू केले आहेत. यामध्ये माईट वॉश प्रोटोकॉल, सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण तसेच वॉशिंग व ड्रायिंग प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच डाळिंबाचे चार किलो क्षमतेच्या प्रमाणित बॉक्समध्ये पॅकेजिंग करून अधिकृत विकिरण सुविधा केंद्रात विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया यूएसडीए व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणी व मान्यतेनंतरच पूर्ण केल्या गेल्या आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate Export: First Container to America, 17,000 Kilos Exported

Web Summary : Maharashtra ships its first pomegranate container to the US. Around 17.6 metric tons of pomegranates were exported after meeting stringent US standards, marking a milestone after a six-year export halt due to technical reasons. The US market shows high demand for Indian varieties.
टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रशेतीअमेरिका