- मतीन शेख
जळगाव : तापी खोऱ्यात देशभरातील अव्वल दर्जाची केळी (Banana Production) उत्पादित केली जाते. या केळीचा पुरवठा आणि विपणनावर लक्ष दिले तर तिची निर्यात (Banana Export) उत्तम प्रकारे होऊ शकते, असा विश्वास ठेवत अंतुर्लीच्या लुकमान शेख या तरुणाने सहा अरब देशात केळीची निर्यात केली आहे. शेख यांच्या पिकवण केंद्रांवरील केळी आज इराण, इराक, सौदी अरब, ओमान, दुबई आणि अफगाणिस्तानात पाठविली जात आहे.
शेख यांनी सात वर्षांपूर्वी एक कंटेनर केळी निर्यात केली होती. स्थानिक शेतकऱ्यांशी साधून ते सातत्याने या परिसरातील केळी आखाती देशातील बाजारात पाठवत आहेत. निर्यातक्षम केळी खरेदी करुन ती निर्यात करण्यासाठी आवश्यक पॅकेजिंग, त्याला कोल्ड स्टोरेज प्रक्रिया आणि निर्यात मानांकन पूर्ण करून मुंबई बंदरावर पोहचविणे ही साखळी प्रक्रिया पूर्ण करणारी कामगारांची फळी त्यांच्याकडे अविरत कार्यरत आहे.
दरम्यान शेख यांनी निर्यात कंपनी स्थापन स्थानिक शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम केळी परदेशात पाठवत आहेत. तर मुंबई येथील निर्यातदार या भागातील केळी बागा पाहण्यासाठी अनेक वेळा भेटी देतात. लुकमान शेख यांच्या केळी निर्यात व्यवसायावर आज अंतुर्ली भागातील सुमारे ७०० कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत.
यात घड वाहतूक करणारे, छाटणी करणारे, वाहतूक, पॅकेजिंग कंटेनर भरणारे अशा विविध स्वरूपात लोकांना काम मिळत आहे. दर्जेदार केळी उत्पादनासाठी तापी खोरे है देशात प्रसिद्ध आहे. या केळीचा गोडवा आणि चव ते सातसमुद्रा पार पोहोचवत आहे.
२०२० मध्ये केळी निर्यातीचा पहिला कंटेनर पाठवला होता. येथूनच निर्यातीचा कारभार सुरू झाला. परिसरातील दर्जेदार केळीला विशिष्ट तापमानात स्टोरेज आणि वाहतूक करून ही केळी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून जलमार्गान विविध देशात पोहचविली जाते. - शेख लुकमान, केळी निर्यातदार, मुक्ताईनगर