Join us

श्वान शर्यतीची क्रेझ का वाढतेय? बक्षिसांत मिळतेय 'थार'! सामान्य माणूसही करू शकतो हा नाद

By दत्ता लवांडे | Published: March 17, 2024 10:26 PM

पश्चिम महाराष्ट्राच्या साताऱ्यात खूप जास्त शर्यती सुरू असल्याने अनेकांनी जातीवंत श्वान पाळायला सुरूवात केल्याचं चित्र आहे.

पुणे : सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीप्रमाणे श्वान शर्यतीची चांगलीच क्रेझ वाढली असून अनेकजण श्वान पाळून त्यांना शर्यतीसाठी तयार करत आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे श्वान शर्यतीमध्ये सहभागी होत असून त्यांना भरघोस बक्षिसांचेही वितरण करण्यात येतंय. सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या साताऱ्यात जास्त शर्यती सुरू असल्याने अनेकांनी जातीवंत श्वान पाळायला सुरूवात केल्याचं चित्र आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात साधारणपणे २००५ सालाच्या आसपास श्वान शर्यती सुरू झाल्याची माहिती आहे. परदेशात श्वान शर्यतीची परंपरा आहे पण आपल्याकडे बैलगाडा शर्यतीप्रमाणे श्वान शर्यतीला परंपरा नाही. पण आता हळूहळू श्वान शर्यतीकडे अनेकजण वळू लागल्याने श्वान शर्यतीला चांगले दिवस आले आहेत. 

श्वानाचे संगोपनशर्यतीसाठी जातीवंत श्वान आणल्यानंतर त्याला पहिल्या वर्षी खर्च करावा लागतो. त्यामध्ये त्याचे लसीकरण, खाद्य, संगोपन आणि शिकवण्याकडे लक्ष द्यावे लागते. तरीही तो खर्च खूप जास्त नसतो. खाद्यामध्ये त्यांना भाकरी, चिकनचा आणि मिनरल, व्हिटामिन्सचा सामावेश असणे गरजेचे असते. हा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा असतो. सहा महिन्यानंतर त्याला शर्यतीसाठी तयार करण्याला सुरूवात करावी लागते.

बी-ग्रेड श्वानाच्या शर्यतीजे श्वान आत्तापर्यंतच्या शर्यतीमध्ये कधीच पहिल्या तीन क्रमांकात आले नाहीत असा श्वानांसाठी आता बी ग्रेड शर्यती आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये जे श्वान नावाजलेल्या श्वानाला टक्कर देऊ शकत नाहीत अशा श्वानाला संधी मिळते. त्यामुळे आता शर्यतींची संख्यासुद्धा वाढली आहे. 

ही आहे महाराष्ट्राची ‘पोस्टर गर्ल’, तिनं शेतकऱ्याला मिळवून दिल्या ४ बाईक

शर्यती, बक्षिसे आणि अर्थकारणसध्या राज्यभरात साधारण ५०० पेक्षा जास्त शर्यतीचे श्वान असून पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात आणि पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात शर्यती सुरू आहेत. या शर्यतीमध्ये २१ हजार रूपये, ५१ हजार रूपये, एक लाख रूपये, एक बाईक, बुलेट, थार गाडी, ट्रॅक्टर अशी बक्षिसे ठेवण्यात येतात त्यामुळे जिंकणाऱ्याला या स्पर्धांमधून चांगले अर्थार्जन होते. म्हणून श्वान शर्यतीची क्रेझ वाढत असून बक्षिसांची रक्कमही वाढत आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना पारंपारिक वासरा लाभलाय. या बैलगाडा शर्यती आणि खिल्लारचं जसं वेगळं अर्थकारण आहे तसंच श्वान शर्यतीमुळे महाराष्ट्रात आता वेगळं अर्थकारण आकाराला येऊ लागलंय. यामध्ये अनेक श्वानपालक सहभागी होत असून दिवसेंदिवस श्वान पालकांची संख्या वाढत आहे. 

सध्या महाराष्ट्रात साधारणपणे ५०० ते ५५० शर्यतीची कुत्रे आहेत. स्पर्धाही चांगल्या होत असून ५१ हजार रूपये, बाईक, बुलेट, ट्रॅक्टरपासून ते थार गाडीपर्यंत बक्षीसे असतात. साताऱ्यात जास्त श्वान शर्यती होत असून इतर परिसरातही बैलगाडा शर्यतीप्रमाणे दररोज कुठे ना कुठे श्वान शर्यती सुरू आहेत. श्वान शर्यतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.- सुरज जाधव (श्वानपालक शेतकरी, पुसेगाव, सातारा)  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकुत्रा