Join us

देशात सर्वोच्च साखर उत्पादन करण्यात कोणते राज्य आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 4:46 PM

मार्च महिना अखेर देशभरातील २०९ कारखान्यात ऊस गाळप सुरु असून गेल्या वर्षीच्या या तारखेशी तुलना करता २५ जास्त कारखान्यांचा हंगाम अजूनही सुरु आहे.

नवी दिल्ली : मार्च महिना अखेर देशभरातील २०९ कारखान्यात ऊस गाळप सुरु असून गेल्या वर्षीच्या या तारखेशी तुलना करता २५ जास्त कारखान्यांचा हंगाम अजूनही सुरु आहे. एकूण ३२६ कारखान्यांमधील गाळप हंगाम संपत असून गेल्या वर्षीच्या मार्च अखेर तुलना करता २४ कारखाने कमी बंद झाले आहेत.

एकूण गाळप झालेला २,९५० लाख टन ऊस हा गतवर्षीच्या या तारखेला झालेल्या गाळपापेक्षा जरी १०२ लाख टनाने कमी असला तरी सरासरी साखर उताऱ्यात ०.२८ टक्के  वाढ झाल्याने निव्वळ ३०० लाख टन साखर उत्पादन हे जवळपास गेल्यावर्षी मार्च अखेर झालेल्या साखर उत्पादनाच्या बरोबरीने आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने प्रसारित केलेल्या परिपत्रकाद्वारे दिसत आहे.

मार्च अखेर राज्य निहाय झालेल्या निव्वळ साखर उत्पादनाची आकडेवारी थोडी गमतीशीर दिसत आहे. ज्या उत्तर प्रदेशाने गेल्या दोन वर्षात साखर उत्पादनात अग्रक्रम राखला होता त्या राज्यातील या अगोदरच्या ११५ लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजाच्या तुलनेत मार्च अखेर ९७ लाख टन उत्पादन झाले असून हंगाम अखेर ते १०५ लाख टनापर्यंत सीमित होणे अपेक्षित आहे.

मात्र महाराष्ट्राने मार्च अखेर केलेल्या १०७ लाख टन साखर उत्पादनामुळे आणि अजूनही ६७ साखर कारखान्यात सुरु असलेले साखर उत्पादन लक्षात घेता हंगाम अखेर १०९ लाख टन साखर उत्पादन करून महाराष्ट्र देशात पहिला क्रमांक प्रस्थापित करण्याचे अपेक्षित आहे.

कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू व उत्तर आणि दक्षिणेतील इतर सर्व राज्ये मिळून यंदाच्या हंगाम अखेर देशातील निव्वळ साखर उत्पादन ३१८ लाख टन होण्याचे अंदाजित असून ते गतवर्षीच्या अंतिम ३३०.९० लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत फक्त सुमारे १३ लाख टनाने कमी राहणार आहे.

या व्यतिरिक्त १७ लाख टन साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यात आलेली आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे.

अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठीसुरवातीच्या अंदाजापेक्षा अतिरिक्त उत्पादित होणाऱ्या साखरेचा विचार करता तसेच हंगाम सुरुवातीची शिल्लक साखर आणि साखर निर्यातीवरील बंदी ध्यानात घेता किमान १५ ते १८ लाख टन अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होऊ शकतो.

विशेषतः केंद्र शासनाने डिसेंबर मध्ये अकस्मात लादलेल्या इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे जो बी हेवी मळीचा शिल्लक साठा कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पात अडकून पडला आहे त्याचा पूर्ण वापर केल्यास १७० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन वाढू शकते.

त्याद्वारे पेट्रोल मध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण केंद्र शासनाने निश्चित केलेल्या लक्ष्यपूर्तीसाठी हातभार लावू शकते, असे निवेदन केंद्र शासनाशी संबंधित मंत्रालयांकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिले आहे व त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने म्हटले आहे.                        

टॅग्स :साखर कारखानेऊसकेंद्र सरकारपेट्रोलसरकार