Join us

ड्रोन तंत्रज्ञान, खाद्य महोत्सवासह परभणीच्या कृषी प्रदर्शनात काय काय असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:33 IST

आजपासून ३०० दालनातून कृषी जागर पश्चिम विभागीय कृषी मेळावा; कृषी तज्ज्ञांचाही सहभाग

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे २१ फेब्रुवारीला क्रीडा संकुल प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणी हे राहणार असून, विशेष अतिथी म्हणून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल असेल. ३०० दालन उभारण्यात येणार आहेत.कृषी मेळाव्यात पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यासह दीव-दमण आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी संशोधक, धोरणकर्ते, कृषी कंपन्या, कृषी अधिकारी, कृषी विस्तारक आणि कृषी उद्योजक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे. मेळाव्याचा मुख्य विषय 'हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी' आहे. यात चर्चासत्रे, शास्त्रज्ञ शेतकरी संवाद आदींद्वारे विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान, कृषी संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कृषी प्रदर्शनीत अद्ययावत कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या ३०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश राहणार आहे.

खाद्य महोत्सवासह आणखी काय असणार?

विशेषतः दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, कीटकनाशके, कृषी अवजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पद्धती, पशुधन इत्यादी दालनांचा समावेश राहील. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने बचत गटांच्या दालनांचा समावेश असलेल्या खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सर्व शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी अधिकारी आणि कृषी विस्तारक यांनी कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आत्मा संचालक दशरथ तांभाळे, समन्वयक अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. प्रशांत देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, तुकाराम मोटे, संतोष आळसे आदींसह आयोजक समितीने केले आहे.

टॅग्स :वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपोलीस अधीक्षक, परभणीशेती क्षेत्र