Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय?

By बिभिषण बागल | Updated: August 23, 2023 10:07 IST

नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात. त्याच लाल्या रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे?

कपाशीला लागणारे पाते, फुले व बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते. नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नेपथ्यालीन ॲसिटिक ऍसिड (NAA) किंवा प्लानोफिक्स या संजीवकाची हेक्टरी १०० मिली ५०० लि. पाण्यातून (१५ लि. पाण्यात ३ मिली) पाते लागल्यानंतर फवारणी करावी. यामुळे गळ कमी होऊन कपाशीच्या उत्पादनात सुमारे १० टक्के वाढ होते.

लाल्या रोग व्यवस्थापनकपाशीचे पाने विशेषतः बोंड वाढीच्या अवस्थेत लाल होतात, त्याची प्रमुख कारणे म्हणजे पिकाच्या त्या अवस्थेत नत्राची कमतरता तसेच तुडतुड्यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे जमिनीत अति ओल किंवा अति कोरडची परिस्थिती निर्माण झाली तरीही कपाशीवर लाल्या (पाने लाल होणे) होतो. ही विकृती आहे, रोग नाही. कपाशीची पाने लाल होऊ नये म्हणून पिकास रासायनिक खताची शिफारशीत मात्रा योग्य वेळी योग्य प्रमाणात द्यावी. त्यातील २०% नत्र लागवडीच्या वेळी ४०% नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी उर्वरित ४०% नत्र लागवडीनंतर ६० दिवसांनी द्यावे. कापसाचा बीटी वाण लागवड केला असल्यास शिफारशीत खताच्या मात्रेपेक्षा २५% खत जास्त द्यावे. मॅग्नेशियम सल्फेट हेक्टरी २० ते ३० किलो जमिनीत द्यावे तसेच पाने लाल होताना दिसल्यास २% डीएपी खताच्या (१०लि. पाण्यात २००ग्रॅ.) १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरणीच्या वेळी शिफारस केलेली खते पुरेशा प्रमाणात दिली नसल्यास केव्हा दिलेली खते जमिनीतील ओलीअभावी पिकात अन्नद्रव्याची कमतरता निर्माण  होते आणि पिकांच्या पानावर विशिष्ट लक्षणे दिसून येतात अशावेळी ज्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे लक्षणे दिसतात त्या अन्नद्रव्यांची पिकावर फवारणी केल्यास उत्पादनातील संभाव्य घट टाळता येते. नत्राच्या कमतरतेमुळे पिकाची खालची पाने पिवळे होतात झाडाची व मुळाची वाढ थांबते, पुढे फूट व फळे/फुले कमी येतात. हे टाळण्यासाठी पिकावर युरिया खताची १ टक्के (१०लि. पाण्यात १०० ग्रॅ.) फवारणी करावी.

स्फुरद अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची पाने हिरवट लांबट होऊन त्यांची वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते यासाठी डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताची १-२% (१०लि. पाण्यात १००-२००ग्रॅम) फवारणी करावी. पालाशची कमतरता निर्माण झाल्यानंतर पिकाच्या पानांच्या कडा तांबट होतात, पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात तसेच शेंडे गळून पडतात, खोड आखूड होते. यावर उपाय म्हणून १% (१०लि. पाण्यात १००ग्रॅ.) सल्फेट ऑफ पोटॅशियमची फवारणी करावी.

डॉ. कल्याण देवळाणकरकृषी शास्त्रज्ञ7588036532

टॅग्स :कापूसकीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपीकखरीप