Join us

काय सांगता? 'हे' फळ खाल्ल्यानंतर आंबट लिंबू अन् तिखट मिरचीसुद्धा लागते गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 7:42 PM

'हे' फळ खाल्ल्यानंतर मिरची अन् लिंबूही लागते गोड

निसर्गामध्ये अनेक चमत्कार असतात जे आपल्याला माहिती नसतात. त्याचप्रमाणे मिरॅकल फ्रुट नावाचे एक काटेरी झुडूपासारखे दिसणारे फळझाड असून त्याचे फळे छोट्या बोरासारखे असतात. या झाडाचे पिकलेली फळे खाल्ल्यानंतर कोणत्याही चवीचे पदार्थ खाल्ले तर ते गोड लागतात. तिखट मिरची अन् आंबट लिंबूसुद्धा हे फळ खाल्ल्यानंतर गोड लागते. हे या झाडाचे वैशिष्ट्ये आहे.

दरम्यान, या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव Synsepalum dulcificum असं असून ही Sapotaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. ही वनस्पती मूळ आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय वाळवंटातील आहे . या झाडाला गावरान बोरासारखे छोटेछोटे फळे येतात. या फळामध्ये मिरॅक्युलिनचे प्रमाण असल्यामुळे हे फळ खाल्ल्यानंतर इतर कोणतेही फळ गोड लागते.

फळांच्या गुणधर्मामुळेच या झाडाला मिरॅकल फ्रुट असे नाव पडल्याचं बोललं जातं. ही मुळात भारतीय वनस्पती नसल्यामुळे आपल्याकडे हे झाड खूप कमी आढळते. या झाडाची उंचीही कमीच असते. करवंदाच्या काट्यासारखे आणि पानासारखे या झाडाची पाने असतात. 

या झाडाची फळे सुरूवातीला हिरवे असतात. पिकल्यानंतर ती लाल रंगाची होतात. खाण्यासाठी ही फळे चवीला गोड असतात. साधारण तीन ते चार फळे आपण चघळून खाल्ल्यानंतर वरून कोणताही तिखट किंवा आंबट पदार्थ खाल्ला तरी त्याची चव गोड लागते. 

कुठे व कशी केली जाते शेती?हे फळ मूळ आफ्रिकेतील असून साधारण १८ व्या शतकापासून इतर देशांना याची ओळख झाल्याचं सांगण्यात येतं. आफ्रिकेतील योरूबा जमातीच्या लोकांच्या आहारात या फळांचा सामावेश असतो. जेवणापूर्वी ते हे फळे चघळतात अशी माहिती आहे. १९८० च्या दरम्यान युनायटेड स्टेट्समध्ये या फळांची व्यावसायिक पद्धतीने लागवड करण्याचा प्रयत्न झाला होता. 

झाडांच्या लागवडीसाठी ४.५ ते ५.८ सामू असलेली माती आणि निचरा होणारी जमीन असावी लागते. बियाणे उगवण्यासाठी १४ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. दोन झाडांमधील अंतर हे १३ फुटाचे असायला पाहिजे असे मत जाणकारांनी सुचवले आहे. ३ ते ४ वर्षांच्या वाढीनंतर या झाडाला फळे येतात. या फळाच्या बिया कॉफी बीनसारख्या असतात. ही झाडे महाराष्ट्रातील काही नर्सरीमध्ये मिळू शकतात पण याची व्यावसायिक लागवड करताना शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेचा विचार करायला हवा. कारण या फळाची विक्री व्यवस्था आपल्याकडे विकसित झालेली नाही. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी