Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची पाने कशामुळे पिवळी पडतात ? त्यावर उपाय कसा करावा

By बिभिषण बागल | Updated: August 11, 2023 02:00 IST

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.

यावर्षी सोयाबीनची पेरणी उशिराने झालेली आहे तसेच मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली आहे. त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन रोप अवस्थेतच पिवळे-पांढरे पडत आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.

लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

कारणे: लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस होतो.

व्यवस्थापन: शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. वापसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी. ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम किंवा ५० मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास ८-१० दिवसांनी परत एकदा फवारणी करावी. पाण्याचा ताण पडल्यास तुषारच्या साह्याने संरक्षित पाणी द्यावे. सिंचन सुविधा उपलब्ध नसल्यास १३:००:४५ (पोटॅशियम नायट्रेट) या विद्राव्य खताच्या १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार ८ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी. मांडगे यांनी दिली.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी०२४५२-२२९०००  

टॅग्स :शेतीशेतकरीकीड व रोग नियंत्रणखतेविद्यापीठ