Join us

तुरीची आवक घटली; दराची धाव उच्चांकाकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:23 IST

मागील खरीप हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्याचबरोबर गतवर्षीच्या खरिपातही पेरा वाढला नाही.

तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समितीत आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने तुरीच्या दरात वाढ होत आहे. शनिवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वसाधारण १२ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे. आगामी काळात आणखीन दरवाढ होण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात गत खरीप हंगामात उशिरा पाऊस झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला होता. जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरपैकी सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. तो ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर होता. तुरीचे क्षेत्र १ लाख १ हजार ७१६ हेक्टर असले तरी प्रत्यक्षात केवळ ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला होता.

उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ...

मागील खरीप हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्याचबरोबर गतवर्षीच्या खरिपातही पेरा वाढला नाही. त्यामुळे दोन वर्षापासून तूर शिल्लक नाही. दरम्यान, तूर काढणीनंतर बहुतांश शेतकयांनी आर्थिक अडचणींमुळे विक्री करण्यास सुरुवात केली. परिणामी, दरात वाढ झाली नाही. आता शेतकऱ्यांजवळील जवळपास ७५ टक्के तूर विक्री झाली आहे. उर्वरित तूर बी-बियाणांसाठी ठेवली आहे. सध्या बाजारात आवक कमी झाल्याने आणि ग्राहक अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. नितीन कलंत्री, दाळ उत्पादक.

बाजारात तेजी पण शेतकऱ्यांकडे तूर नाही...

परतीचा पाऊस न झाल्याने तूर उत्पादन घटले. सुरुवातीस भावही नव्हता. आता बाजारात तुरीच्या भावात तेजी आली आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे तूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. - मुरली बोंडगे, शेतकरी.

एप्रिलपासून दरवाढ

लातूरच्या बाजार समितीत जिल्ह्याबरोबर परजिल्ह्यातील आणि कर्नाटक, तेलंगणा राज्यातील शेतमालाची आवक होते. गत खरिपात एप्रिल रोजी कमाल १२ हजार ३१ रुपये तर सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता

टॅग्स :तूरबाजारशेती