Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना चाखता येणार मधाचा गोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 10:32 IST

भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाचा गोडवा चाखता यावा यासाठी उद्यानात ‘मधुबन‘ मध विक्री केंद्र सुरु

मुंबईतील बोरवलीच्या राष्ट्रीय उद्यानात आता मधाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधाचा सुप्रसिद्ध ब्रँड मधुबन आता संजय गांधी उद्यानात उपलब्ध झाला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात फुलझाडे असल्यामुळे येथे उत्तम दर्जाची मधनिर्मिती  होऊ शकते. त्यामुळे  खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उद्यानात मधमाशा पालन करण्यात येणार आहे. यासाठी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण येथील कर्मचाऱ्यांना खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने देण्यात येणार आहे. सोबतच मंडळ मधपेट्या उपलब्ध करून देऊन उद्यानाकडून तयार मध खरेदी देखील करणार आहे. यासोबतच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाचा गोडवा चाखता यावा यासाठी उद्यानात ‘मधुबन‘ मध विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधाचा सुप्रसिद्ध ब्रॅंड ‘मधुबन‘ आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही उपलब्ध झाला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्यानात मध विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सभापती रवींद्र साठे, संजय गांधी उद्यानाचे संचालक जी मल्लिकार्जुन, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, संजय सोनावाले,रेणुका कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रबोरिवली