Join us

लाखांच्या जोडीला ७० हजारांचा भाव, चाऱ्याअभावी शेतकऱ्यांनी जनावरे बांधली दावणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:02 AM

पाणीटंचाई, चारा टंचाई अभावी येणार्‍या तीन चार महिन्यात उदरनिर्वाह कसा करायचा या भितीने पशुपालक आपले पशुधन विक्री करतांना दिसून येत आहे.

श्याम पुंगळे

मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई, पशुखाद्य आणि चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचत नसल्यामुळे जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होत आहेत. महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जीवापाड जपलेल्या गायी-गुरे-म्हशींची विक्री करण्याची वेळ आता जालना जिल्ह्यातील राजूर परिसरातील बळीराजांवर आली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात अनेकांनी काही कारणास्तव कवडीमोल भावात जनावरे विकल्याचे दिसून आले. एक लाखांना घेतलेली बैलांची जोडी चाऱ्याअभावी आता ७० हजारांना विकावी लागली, असे तडेगाव येथील शेतकरी गणेश साळवे यांनी संगितले.

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

एप्रिल, मेमध्ये चाराच मिळणार नाही, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी एक महिना अगोदरच जीवापाड जपलेली गायी, गुरे, बैल, म्हशी विक्रीचा निर्णय घेतला आहे. हे पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

व्यापाऱ्यांशिवाय दुसरा खरेदी करणारा नाही

आता सर्व शेतकऱ्यांची पेरणीची कामे आटोपली आहेत. सध्या जनावरांसाठी मुबलक चारा नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली आहे. यात एकही शेतकरी जनावरे घेत नाहीत, त्यामुळे व्यापाऱ्यांना मागेल त्या भावात विकण्याची वेळ आली आहे पण जून महिन्यात पेरणीमध्ये शेतकऱ्यांना मोठी रक्कम मोजून व्यापाऱ्यांकडून जनावरे घ्यावी लागणार आहेत. - हरी क्षीरसागर, शेतकरी असोला

जनावरे विक्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गायी-म्हशी पाळल्या आहेत, दुष्काळावर मात करीत अनेकांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरु केला होता. मात्र, सतत चारा व जनावरांच्या खाद्यात होणाऱ्या दरवाढीमुळे हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरे विक्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. - गणेश साळवे, शेतकरी तडेगाव

हिरव्या चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायावर संकट

• हिरव्या चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुग्ध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो परंतु आता हा व्यवसायही धोक्यात आला आहे.

• माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जिवांचीही होरपळ होत आहे. पाणी, चाऱ्याअभावी पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

• यंदा परिसरातील शेतकऱ्यांना दुबार हंगाम घेता न आल्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकुटीला आला असून, व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे.

टॅग्स :प्राण्यांवरील अत्याचारपाणीकपात