Join us

चिरतरुण दिसण्याचा हट्ट जीवघेणा! जगभरात वाढली गाढवांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:00 IST

तरूण दिसण्यासाठी काही औषधांमध्ये गाढवांच्या त्वचेचा वापर केला जातो. या औषधाची मागणी आता गाढवांच्या जीवावर उठली आहे.

चीनमधील लोक काय करतील, याचा नेम नाही. चीनमध्ये तरुण दिसण्यासाठी काही पारंपरिक औषधांमध्ये गाढवांच्या त्वचेचा वापर केला जातो. या औषधाची मागणी चक्क गाढवांच्या जिवावर उठली असून, त्यापाई अनेक देशांमधून गाढवे चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

इंग्लंडमधील डाँकी सेंचुरीने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आफ्रिका, पाकिस्तान व इतर देशांमधून गाढवांची चोरी होत आहे. गाढवांच्या त्वचेत जिलेटीन नावाचे तत्त्व असते. त्याचा वापर करून औषधोपचार केले जातात. त्यास 'एजियाओ' म्हणतात. या औषधासाठी गाढवांना ठार केले जाते.

पाकिस्तानातील गाढवांना चीनमध्ये मोठी मागणी, विक्री वाढली

काही वर्षांपासून पाकिस्तानातून चीनमध्ये गाढवांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका अहवालानुसार पाकिस्तानात २०२२मध्ये ५८ लाख गाढवे होती. चीनने पाकिस्तानकडे मोठी मागणी केल्यामुळे पाकिस्तानात चांगल्या प्रजातीच्या गाढवांचे प्रजनन वाढले आहे.

चीनचा जगातील गाढवांवर डोळा

■ गाढवाच्या त्वचेमध्ये अँटी-एजिंग अर्थात तारुण्य टिकवण्यास उपयोगी ठरणारी तत्त्वे असतात.

■ एजियाओ औषधोपचारासाठी मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे चीनमध्ये गाढवांची संख्या झपाट्याने घटली आहे.

■ त्यामुळे इतर देशांमधून गाढवाची चोरी होत आहे.

प्रचंड अत्याचार

या व्यापारात गाढवांवर प्रचंड अत्याचार होतात. त्यांना अतिशय अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने मारण्यात येते. त्यांची नीट काळजी न घेतल्यामुळे अनेक गाढवांचा वाटेतच मृत्यू होतो. गाढव मजबूत आणि कठीण वातावरणातही राहू शकतात. मात्र, त्यांचा प्रजननाचा वेग कमी आहे. गरीब देशांमध्ये अनेक जण लहानमोठ्या मालवाहतुकीसाठी गाढवांचा वापर करतात. गाढवांची संख्या घटत राहिल्यास गरिबांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :शेती क्षेत्रप्राण्यांवरील अत्याचारवैद्यकीय