Join us

घाबरलेले वानर बसले थेट शेतकऱ्याच्या कडेवर अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:54 PM

एखाद्या वादानंतर चार-पाच जण मिळून एकाला मारहाण करत असल्यास, तो आपल्या सुटकेसाठी धावत जाऊन कुणाचा तरी आसरा घेतो. वानरांना ...

एखाद्या वादानंतर चार-पाच जण मिळून एकाला मारहाण करत असल्यास, तो आपल्या सुटकेसाठी धावत जाऊन कुणाचा तरी आसरा घेतो. वानरांना माणसाचे पूर्वजही म्हटले जाते. त्यामुळे ही मानवी प्रवृत्ती वानरांमध्येही दिसून येते. याचा अनुभव परतूर तालुक्यातील सोयंजना गावात रविवारी घडलेल्या घटनेने ग्रामस्थांना आला.

वानराच्या टोळीतील सदस्यांकडून एका वानराला मारहाण होत असल्याने, त्याने चक्क शेतात उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा आसरा घेतला. त्याला पाहून इतर वानर पळून गेले. यानंतरही प्रचंड घाबरलेले हे वानर शेतकऱ्याला काही सोडेना. अखेर शेतकऱ्याने या वानराला चक्क लहान मुलाप्रमाणे कडेवर बसवून गावात आणले. त्याला पाहून नागरिकांसह महिला व बच्चे कंपनी कुतुहलाने या शेतकऱ्याकडे पाहत होती.

परतूर तालुक्यातील सोयंजना येथील शेतकरी परमेश्वर ढवळे नेहमीप्रमाणे रविवारी शेतात गेले होते. शेतात फेरफटका मारताना त्यांना एका झाडावर वानरांमध्ये कडाक्याचे भांडण लागल्याचे दिसून आले. त्याच वेळी एका वानराला दुसऱ्या वानराच्या टोळीतील सदस्यांकडून चावा घेत असल्याचे त्यांना दिसले. मात्र, त्याच वेळी मार खाणारे वानर ढवळे यांच्याकडे धावत आले व त्यांच्या कडेवर जाऊन बसले. त्या वानरांपासून जीव वाचवल्यानंतरही ढवळे यांना वानराने सोडले नाही. ते त्यांच्या कडेवर शांतपणे बसून राहिले.

वानर कडेवरून उतरत नसल्याचे पाहून, त्यांनीही त्याला कडेवर बसवून गावात आणले. लहान मुलाप्रमाणे वानराला कडेवर घेऊन येताना त्यांना पाहून गावकरीही विचारपूस करू लागले. ढवळे यांच्याकडून घटनाक्रम समजल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले. अखेर वानराच्या टोळीपासून आपण सुरक्षित असल्याचे दिसून आल्यावर त्यांच्या कडेवरून उतरत वानराने धूम ठोकली.

टॅग्स :शेतकरीपरतूरमाकडजालना