Join us

कापूस, सोयाबीन सह अनेक पिकांच्या कर्ज मर्यादेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक ते पाच हजारांपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:48 AM

स्केल ऑफ फायनान्स

अनिल भंडारी

चालू वर्षात शेतकऱ्यांना जिरायती कापूस पिकासाठी हेक्टरी ६५ हजार, तर बागायतीसाठी ७० हजार रुपये आणि सोयाबीनसाठी हेक्टरी ५५ हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा काही पिके व फळ पिकांच्या कर्ज मर्यादत वाढ झाली असून, पात्र शेतकऱ्यांनी गरजेनुसार पतपुरवठ्यासाठी संबंधित क्षेत्रातील बँकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

बीड जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने खरीप व रब्बी हंगाम २०२४-२५ साठी अल्पमुदती खेळते भांडवल, कर्ज वाटपाचे पीकनिहाय कर्जदर, रेशीम शेती उद्योग व मधुमक्षिका पालन तसेच पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी शेतकऱ्यांना वाटप करणाऱ्या पीक कर्ज दराची निश्चिती केली आहे.

नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने पीकनिहाय प्रतिहेक्टरी पीक कर्ज व पशुसंवर्धन तसेच मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवल कर्जमर्यादा ठरविली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने २०२३-२४ साठी पीक कर्ज दर (स्केल ऑफ फायनान्स) निश्चित केले. त्यानंतर बीड जिल्हा समितीने दर निश्चित केले.

तुरीच्या कर्जमर्यादेत ४ हजारांची वाढ, उडीद, मुगाला २२ हजार

जिरायती तुरीसाठी हेक्टरी ४५ हजार, तर बागायती तुरीसाठी ४८ हजार रुपये कर्ज दर निश्चित केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हेक्टरी ४ हजार रुपये वाढ झाली आहे. उडीद व मुगासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज दर निश्चित केला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत हेक्टरी ३ हजारांनी कर्जमर्यादा वाढ केली आहे. खरीप बागायती व जिरायती भुईमुगासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. सूर्यफुलासाठी हेक्टरी ३० हजार, जिरायतीसाठी व बागायतीसाठी ३५ रुपयांपर्यंत कर्जमर्यादा आहे.

कपाशीत पाच, सोयाबीनसाठी एक हजाराची वाढ

• जिल्हा तांत्रिक समितीने निश्चित केल्यानुसार जिरायती कापूस पिकासाठी प्रतिहेक्टरी ६५ हजार, तर बागायती कापूस पिकासाठी ७० हजार रुपये प्रतिहेक्टरी कर्ज दर निश्चित करण्यात आलेला आहे.

• मागील वर्षी कपाशीचा दर ६० हजार रुपये होता. सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ५४ हजार रुपये कर्ज दर मागील वर्षी होता.

• यात हेक्टरी एक हजार रुपयांची मर्यादा वाढविली असून, ती आता हेक्टरी ५५ हजार रुपये करण्यात आलेली आहे.

रब्बी कांद्यासाठी ९५ हजार, तर बटाट्यासाठी ८३ हजार

बटाटा पिकासाठी गतवर्षीप्रमाणे हेक्टरी ८३ हजार रुपये कर्जमर्यादा निश्चित आहे. तर खरीप कांदा पिकासाठी हेक्टरी ७५ हजार रुपये आणि रब्बी कांद्यासाठी ९५ हजार रुपयांची कर्जमर्यादा असणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात कांदा पिकासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दिसत आहे.

केसर आंब्यासाठी अन् द्राक्षाला किती?

केसर आंबा पिकासाठी हेक्टरी दीड लाखापर्यंत कर्जमर्यादा गतवर्षीप्रमाणे कायम ठेवली आहे. तर दाक्ष पिकासाठी हेक्टरी मर्यादा ७५ हजारांनी कमी करून ४ लाख रुपये कर्जमर्यादा निश्चित केली आहे. मोसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ, पपईसाठी गतवर्षीप्रमाणेच कर्जमर्यादा राहणार आहे.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :पीक कर्जबीडशेतकरीशेती