Join us

दुष्काळ असूनही राज्यातील उन्हाळी हंगामातील पिकपेरा वाढला! कुठे किती झाली पेरणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 6:25 PM

उन्हाळी ज्वारीची पेरणी कमालीची वाढली आहे. 

पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून उन्हाळी हंगामात पेरणी आणि लागवड झालेल्या पिकांचा पेरणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये यंदा उन्हाळी पिकांची पेरणी किंवा लागवड ही १५ एप्रिल अखेर १० टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. तर उन्हाळी ज्वारीची पेरणी कमालीची वाढली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही पिकपेरा वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

दरम्यान, राज्यात उन्हाळी हंगामात बाजरी, ज्वारी, तृणधान्य, कडधान्ये, मका, भात, भुईमूग, सुर्यफूल, तीळ, सोयाबीन या पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळी हंगामातील पिकांचा राज्यात ३ लाख ८४ हजार ४२४ हेक्टर पेरा झाला आहे. तर मागील वर्षी याच दिवशी उन्हाळ पिकांचा पेरा हा ३ लाख ३८ हजार ३७५ हेक्टर एवढा होता. 

उन्हाळ पिकांसाठी मागच्या पाच वर्षांची सरासरी पाहिली तर ३ लाख ४९ हजार ७५९ हेक्टर एवढी आहे. तर यावर्षी मागील पाच वर्षाच्या तुलनेत ११० टक्के तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ११४ टक्के क्षेत्रावर उन्हाळ पिकांची पेरणी किंवा लागवड झालेली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही हे क्षेत्र वाढले आहे. 

कोणत्या विभागात किती पेरा?कोकण विभागात ७ हजार ४२० हेक्टर, नाशिक विभागात ३२ हजार ९३ हेक्टर, पुणे विभागात २५ हजार ७ हेक्टर, कोल्हापूर विभागात ५ हजार ७८७ हेक्टर, छत्रपती संभाजीनगर विभागात २४ हजार ५६२ हेक्टर, लातूर विभागात ५१ हजार ९१ हेक्टर, अमरावती विभागात ६६ हजार ५९६ हेक्टर तर अमरावती विभागात १ लाख ७१ हजार ८६९ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

सर्वांत कमी पेरा हा कोल्हापूर विभागात झाला असून येथे केवळ ५ हजार ७८७ हेक्टरवर उन्हाळ पिकांची पेरणी झाली आहे. तर सर्वांत जास्त पेरा हा नागपूर विभागाचा असून येथे १ लाख ७१ हजार ८६९ हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी