Pune : शेतामध्ये लावलेला ऊस साधारण २० ते २५ फुटापर्यंत वाढू शकतो. या वाढलेल्या उसाच्या कांड्या या ५० ते ६० च्या घरात असतात. सर्वसाधारणपणे यापेक्षा जास्त उंचीचा ऊस तुम्ही पाहिला नसेल. पण पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या काशिनाथ झांजले यांनी आपल्या दारात लावलेल्या उसाच्या बेटातील काही उसाची उंची ही ३५ फुटापर्यंत गेलेली आहे.
कोथरूडच्या गणेश कॉलनीत राहणाऱ्या आणि मूळच्या मुळशी तालुक्यातील असणाऱ्या काशिनाथ झांजले यांनी शेतीची आवड म्हणून आपल्या दारात ऊस लावला होता. रसवंतीच्या दुकानातून त्यांनी उसाचे टिपरे आणून लावले होते. त्यांच्या सांगण्यानुसार २२ महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या दारात उसाचे बेट लावले आणि त्यानंतर या उसाची वाढ तब्बल १०० कांड्यांपर्यंत गेली आहे.
या बेटामध्ये साधारण १० ऊस असून यातील २ ते ३ ऊस ३० फुटांपेक्षा जास्त वाढलेले आहेत. तर त्यातील २ उसाला १०० पेक्षा जास्त कांड्या लागल्या आहेत. सर्वांत उंच असलेल्या उसाला १२० पेक्षा जास्त कांड्या आहेत. विशेष म्हणजे या कांड्यांच्या पेरांची लांबी कमी असून या उसाचा अजूनही तुरा आलेला नाही.
दारातच रस्त्याच्या बाजूला लावलेल्या या बेटाला कोणतेही विशेष खत न वापरता केवळ शेणखत टाकले असल्याचं ते सांगतात. अधूनमधून गाडी धुवत असताना बेटातही पाणी दिले जाते, अन्यथा दररोज या उसाच्या बेटाला पाणी दिले जात नाही.
रसवंतीमधून टिपरे आणून लावल्यामुळे या उसाची जात माहिती नाही. पण एक आवड म्हणून आणि मातीशी नाळ जपावी म्हणून दारात लावलेला उस १०० कांड्याचा होऊ शकतो किंवा ३५ फुटापर्यंत वाढू शकतो हे काशिनाथ झांजले यांनी दाखवून दिले आहे.