Join us

Sugarcane FRP : गाळप हंगाम संपला पण राज्यातील 'एवढ्या' कारखान्यांकडे FRPची रक्कम बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 7:04 PM

राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. यामध्ये २०३ सहकारी आणि २०४ खासगी साखर कारखाने होते.

Sugarcane Facrory FRP : राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. पण अजूनही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. जवळपास ३० टक्के साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. यामध्ये २०३ सहकारी आणि २०४ खासगी साखर कारखाने होते. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेला साखर गाळप हंगाम १४ मे रोजी संपला असून विदर्भातील मानस अॅग्रो या साखर कारखान्याने सर्वांत शेवटी आपले गाळप थांबवले आहे. 

यंदा मान्सूनच्या पावसामध्ये सातत्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ आणि इतर भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून गाळप हंगाम फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये संपेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याचबरोबर उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही घटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसामुळे उसाला फायदा झाला आहे. 

किती एफआरपी बाकी?राज्यात या हंगामात एकूण १ हजार ७५ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यासाठी वाहतूक आणि तोडणी खर्चासहित ३३ हजार ९४७ कोटी रूपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. त्यापैकी साखर कारखान्यांकडून ३३ हजार २४५ कोटी रूपये वाटण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण एफआरपीच्या रक्कमेतून ९७.९३ टक्के रक्कम देण्यात आली असून कारखान्यांकडे ७०२ कोटी रूपये एफआरपीची रक्कम थकीत आहे. 

दरम्यान, राज्यात गाळप केलेल्या २०७ साखर कारखान्यांपैकी केवळ १४५ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. पण उर्वरित ६२ साखर कारखान्यांकडे ही रक्कम थकीत आहे. साखर आयुक्तालयाने दोन साखर कारखान्यांवर RRC ची कारवाई केली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊस