Join us

मराठवाड्याच्या टोकाई गडावर फुलले राज्यफूल ताम्हण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 12:02 PM

मेहंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा या फुलाचा वृक्ष

इब्राहीम जहागिरदार

महाराष्ट्र सरकारने ज्या ताम्हण फुलाला राज्यफुलाचा दर्जा दिला आहे ते फूल मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा येथील टोकाई गडावर फुलले आहे. हे फूल पाहण्यासाठी अनेक पर्यटक येऊ लागले आहेत. परंतु या फुलाबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे शाळा महाविद्यालयांतून जनजागृती होणे गरजेचे असल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले.

१९९० मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यफुलाचा दर्जा दिला आहे. साधारण एप्रिल ते जून या कालावधीत राणी रंगातील फुलांनी ताम्हणचा वृक्ष बहरलेला दिसतो. साधारण १० ते १५ फूट उंचीने वाढणाऱ्या ताम्हण वृक्षाचे लाकूड सागवानाएवढेच महत्त्वाचे मानले जाते. या झाडाच्या लाकडाचा वापर कोकणात होड्या बनविण्यासाठी केला जातो, असे अभ्यासक सांगतात. उन्हाळ्यात सर्वत्र पानगळ झालेली असताना टोकाईगड कुरुंदा येथे सद्यःस्थितीत ताम्हण फूल फुललेले पहायला मिळत आहे.

गुलाबी, जांभळट आणि पांढरट फुले व त्यामध्ये पिवळसर रंगाचे पुंकेसर सौंदर्याची भर घातलेली उन्हाळ्यात हिरव्यागार पानांवर अधिकच खुलून दिसत आहे. सध्या प्रखर उन पडत असून ताम्हणची मोहक रंग असलेली फुले अनेकांना आकर्षित करत आहेत. परंतु आजमितीस बऱ्याच जणांना राज्य फुल म्हणून प्रतीक असलेल्या फुलांची ओळखही नाही, ही मोठी खंत म्हणावी लागेल, असे निसर्गप्रेमी सांगत आहेत.

रस्त्याच्या कडेला अगदी ताठ मानेने रुबाबदार उभ्या असलेल्या या फुलांकडे पाहून पर्यटकांना आनंद होत आहे. दुसरीकडे काही दिवसांपासून जिल्हा तसेच पर जिल्ह्यांतील पर्यटक येत असून ताम्हण फुलांच्या छायेखाली बसत असल्याचे पहायला मिळत आहे.

टोकाई गडावर ताम्हण फूल फुलले आहे. पण अनेकांना हे फूल कोणते आहे, याची माहितीही नसते. त्याकरिता शाळांमधून याबाबत जनजागृती व्हावी असे वाटते. - मंगेश दळवी, निसर्गप्रेमी

राज्यफूल म्हणून दर्जा मिळालेल्या या ताम्हण फुलाविषयी लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे संवर्धन व संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात या फुलाचे झाड असणे आवश्यक आहे. - मंगेश इंगोले, निसर्गप्रेमी

ताम्हण अनेक नावांनी परिचित

ताम्हण फूल अनेक नावांनी परिचित आहे. जारूळ, बोंदा, बुंद्रा या नावांनीही परिचित आहे. मेहंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो, असे निसर्गप्रेमी गणेश वटमे, संजीवकुमार बेंडके यांनी सांगितले.

टॅग्स :फुलंमहाराष्ट्रहिंगोलीगड