Join us

साहेब घरात साठवून ठेवलेला कापूस विकायचा कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 4:40 PM

गेल्या वर्षीचा भाव बघून यंदा खर्च अफाट, पांढरं सोनं निराशादायी, शेतकरी चिंतेत 

रविंद्र शिऊरकर 

साहेब आमच्या कापसाला भाव कधी मिळणार ? घरात साठवून ठेवलेला कापूस विकायचा कधी ? शेतकऱ्यांच्या चर्चेतील गावागावात हेच चित्र. गेल्या वर्षी दहा हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिक दराने कापसाची विक्री झाली. यावर्षी देखील असाच काही दर राहील या अपेक्षेने बहुतांशी शेतकऱ्यांनी या वर्षी खरीप हंगामात कपाशीची लागवड केली. मात्र झालं उलटं. या वर्षी दुष्काळ परिस्थिती आणि अवकाळीने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. यंदा उत्पन्न कमी मिळाले, खर्च मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा झाला. असं असूनही आता दहाऐवजी ९ किंवा ८ हजार तरी मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचे चित्र आहे. 

सध्या बाजारात कापसाची आवक सरासरी आहे. तरीही कापसाला महाराष्ट्राच्या विविध बाजार समितींमध्ये सरासरी ७१०० पर्यंत भाव मिळत आहे. मात्र, या दराने विक्री करून कापाशीतून हाती काहीच उरत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे कापूस उत्पादक शेतकरी रतन आगवान कपाशीची लागवड शेतकऱ्याला हिताची नसल्याचे ते सांगत होते. नांगरणी, वखरणी, सऱ्या (पट्टया) पाडणे, बियाणे खरेदी, लागवड, उगवण न झालेल्या ठिकाणी पुन्हा लागवड, निविष्ठा, विविध कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची फवारणी, वेळेवर पाऊस न आल्यास उपलब्ध त्या साधनाने विविध सिंचन पद्धतीच्या मदतीने  पाणी देऊन झाडे जगवणे अशा अनेक कष्ट. शिवाय मजुरी खर्च वेगळा.असा सर्व हिशेब बघता कपाशी आता शेतकऱ्यांच्या हिताची राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

नाईलाजास्तव कापूस विकण्याची वेळ

संक्रांतीनंतर दर वाढ होईल अशी आशा होती. मात्र, दर आहे तेच असल्याने आता नाईलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. छोटं घर आहे. त्यात एका बाजूला कापूस टाकला आहे. लेकरांपासून चुली काडी पासून जपत आज वर थांबलो. मात्र, आता विक्री शिवाय पर्याय नाही. - मोहन सूर्यवंशी, कापूस उत्पादक शेतकरी (मनोली ता. वैजापूर जि. छ्त्रपती संभाजीनगर)

टॅग्स :कापूसहवामानबाजार