Join us

लाल रंगाचा हादगा! फुलांची अन् पानांची होते भाजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 9:17 PM

हादग्यामध्येसुद्धा लाल रंगाचा गावरान वाण उपलब्ध असल्याचं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. 

निसर्गामध्ये अनेक पिकांचे आणि झाडांचे वेगवेगळे वाण असल्याचं आपण पाहिले असेल. लाल घेवडा, पिवळ्या रंगाची कोबी, गुलाबी रंगाची कोबी, पिवळ्या रंगाची मिरची असे वाण विकसित केले जातात. पण नैसर्गिक आणि गावरान वाणामध्येसुद्धा असे काही वाण आहेत जे आपल्याला माहिती नसतात. त्याचप्रमाणे हादग्यामध्येसुद्धा लाल रंगाचा गावरान वाण उपलब्ध असल्याचं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. 

आपण साधारण पिवळा किंवा हिरव्या रंगाचा हातगा बघतो. पण लाल रंगाचा हातगा हा खूप कमी ठिकाणी आढळतो. या हादग्याच्या लाल फुलांमध्ये कॅल्शियम आणि विटामिन ए मोठ्या प्रमाणावर असते. या हादग्याच्या फुलांची आणि पानांची भाजी केली जाते. त्याचबरोबर कोवळ्या हिरव्या शेंगाची सुद्धा भाजी करतात. शेवग्यापेक्षा जास्त कॅल्शियम हादग्यापासून मिळते.

या झाडाची फुले आणि फळे पोपट या पक्षाला खूप आवडतात म्हणून या झाडावर पोपटांचे थवे जास्त प्रमाणावर येतात. त्याचबरोबर या झाडाच्या शेंगा खाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कीटक झाडावर येतात. परिणामी शेतीची परिसंस्था टिकून राहते. त्यामुळे या झाडाला शेती परिसंस्थेचा साथीदार असे म्हटले जाते. या झाडाची पाने जमिनीमध्ये लवकर कुजतात त्यामुळे यापासून जमिनीला चांगले खतही मिळते.

माहिती संदर्भ - समीर वाघोले (आनंदमळा अॅग्रो टुरिझम)

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी