Ration Card E-KYC : सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशनकार्ड(Ration Card) धारकास ई-केवायसी(E-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. ई- केवायसी न केल्यास संबंधित लाभार्थ्यांस रेशन दिले जाणार नाही, असा आदेश देण्यात आला आहे.
नियमित रेशन हवे असल्यास लाभार्थ्यांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत बीड(Beed) जिल्ह्यात जवळपास ४३ टक्के रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यात आली आहे. ही टक्केवारी वाढणार आहे.
बीड जिल्ह्यात १६ लाख लाभार्थी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनचा लाभ घेत असलेल्या रेशन कार्डधारकांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानदाराकडे ई-केवायसी करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यातील १६ लाख ९१ हजार ६६० रेशन लाभार्थी आहेत. त्यापैकी ७ लाख २४ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून ९ लाख ६६ हजार लाभार्थ्यांची ईकेवायसी अपूर्ण आहे.
दरम्यान, पुरवठा विभागाच्या वेबसाईटचे काम सुरू असल्याने ई-केवायसी अपडेट डाटा सध्या तरी उपलब्ध नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी करणाऱ्यांची टक्केवारी ही ६५ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. सदरील वेबसाईट योग्य पद्धतीने सुरू झाल्यावर अंतिम आकडेवारी समोर येईल.
धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण
राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे, या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई-केवायसी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत, याची खरी आकडेवारी पुढे येईल. अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल. याद्वारे धान्य घोटाळ्यावर नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
...तर नववर्षात रेशन होणार बंद
रेशन लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी करून घ्यावी अशा सूचना २०२४ मध्ये वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही अनेकांनी आपली ई-केवायसी करून घेतली नाही. ज्यांनी आपली केवायसी करून घेतली नाही, त्यांना नवीन वर्षात रेशन मिळणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.हे ही वाचा सविस्तर : कीटकनाशकांमुळे आंब्याच्या फुल व फळधारणेवर कसा होतो परिणाम? वाचा सविस्तर