राज्यात शहरांसारखी गावांमध्येही मिळकत पत्रिका देण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ३०,६१४ गावांपैकी ४९ टक्के अर्थात १४,९५२ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे. मिळकतीचे नकाशे काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
महिनाभरात मिळकत पत्रिकेसोबत ड्रोनचे छायाचित्रही देण्यात येणार आहे. त्यामुळे अचूकता आणखी वाढणार असून, हद्दीवरून शेजाऱ्यांसोबत वादही मिटण्यास मदत होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के, तर वर्ध्यात ८२ टक्के गावांमध्ये मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत.
केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत राज्यातील भूमी अभिलेख विभागाकडून गावांमध्ये मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
राज्यात महसुली गावांची संख्या सुमारे ४४,२०० असली तरी अनेक जिल्ह्यांमधील सुमारे ४ हजार गावांमध्ये गावठाणच नाहीत. काही गावांमध्ये गावठाण असले तरी तेथे गावच राहिलेले नाही.
भूकंप, पाणलोटात संपादन, स्थलांतर अशा कारणांमुळे गावांचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे ३०,६१४ गावांमध्ये नव्याने मिळकत पत्रिका देण्यात येणार आहेत. सुमारे ६ हजार गावांमध्ये यापूर्वी नगर भूमापनाचे काम झाले आहे. या गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यात हे काम हाती घेण्यात येईल.
अशी तयार होते मिळकत पत्रिका■ मिळकत पत्रिकेसाठी सुरुवातीला ड्रोनद्वारे संबंधित मिळकतीचे छायाचित्र घेतले जाते.■ त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन हद्दीची तपासणी करतात.■ यावेळी ग्रामसेवकाची मदत घेतली जाते. तसेच शेजारील हद्दींबाबतही तपासणी व पडताळणी करून रजिस्टरमध्ये नोंद केली जाते.■ ही माहिती करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाकडे पाठविले जातात.■ या विभागाकडूनही मिळकतीच्या हद्दीची पुन्हा पडताळणी करून नकाशे अंतिम केले जातात.■ त्यानंतर ईपीसीआयएस या यंत्रणेमार्फत मिळकत पत्रिका नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते.
फेब्रुवारीत काम पूर्ण■ ड्रोन उडविण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी अखेर गावांचे ड्रोनची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर करण्यात येणारे प्रत्यक्ष पडताळणीचे अर्थात चौकशीचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे.■ मिळकत पत्रिका तयार करण्यात नागपूर विभाग आघाडीवर असून विभागातील ४ हजार ११७ गावांमध्ये अशा पत्रिका तयार करण्यात आल्या. पुणे विभागातील २ हजार १०८ गावांचा समावेश आहे.■ मिळकत पत्रिका तयार झाल्याने प्रत्येक घराच्या मालकीची सनद उपलब्ध होऊन मिळकतींचे संरक्षण झाले आहे.
विभागनिहाय आकडेवारी
विभाग | गावे | मिळकत पत्रिका | टक्के |
पुणे | २,१०८ | ३,४५,१७२ | ५०.३९ |
नाशिक | १,५३३ | २,२६,३३८ | ३३.४० |
अमरावती | २,९३१ | ५,७७,०१४ | ५४.२३ |
नागपूर | ४,११७ | ५,५४,९१८ | ६७.२८ |
संभाजीनगर | २,७४७ | ४,६०,२३५ | ४१.५१ |
कोकण | १,५१६ | १,५८,३५६ | ४०.९८ |
एकूण | १४,९५२ | २३,२२,०३३ | ४८.८४ |
अधिक वाचा: E Peek Pahani : ई-पीक पाहणी करताना बांधावरची झाडे कशी नोंदवाल? पाहूया सविस्तर