Join us

खत, बियाणांचे दर चढे; शेतमालाचे मात्र रुतलें गाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 9:31 AM

शेतकऱ्यांच्या  संकटाची मालिका सुरूच

जयेश निरपळ

सातत्याने बदलते हवामान, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त असताना आता खते आणि बियाणांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाची मालिका सुरू असताना दुसरीकडे शासकीय धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. कधी अधिक पाऊस झाल्यास अथवा दुष्काळ पडल्यास त्याचा फटका शेतीस बसतो. दोन-तीन वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवत असते. ओला अथवा कोरडा दुष्काळ या भागातील शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. याशिवाय अवकाळी पाऊस, गारपीठ, यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांचे नुकसान होते. कधी उत्पादन चांगल्या प्रकारे होऊनही शेतीमालाला भाव मिळत नाही, तर कधी शेतात पिकतच नाही. त्यातच सरकारच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

पारंपरिक पीक घेताना आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडींचा परिणाम देशांतर्गतच्या बाजारावर होतो. शेतीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खुल्या बाजारातून खरेदी करावे लागतात.

काही वर्षांत बियाणे व खतांच्या तसेच कीटकनाशकांच्या किमतीत तिप्पट चौपट वाढ झाली आहे; परंतु शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला मात्र सध्या बाजारात मिळणारा दर हा मागील सात-आठ वर्षांपूर्वीप्रमाणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.

शेतीची नांगरणी, पेरणी व मशागतीचा खर्च त्यानंतर बी - बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरीचा खर्च एकत्रित केल्यास कापसाला किमान १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला पाहिजे; परंतु बाजारात मिळणारा सध्याचा दर पाहिल्यास शेती तोट्यात आहे. - राहुल ढोले, शेतकरी

लागवड, मशागतीचा खर्चही निघेना...

बी-बियाणे, रासायनिक खते व लागवडीचा खर्च पाहता शेती करणे अवघड झाले आहे. शासन अनुदान देते; परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिल्यास शेतकऱ्यांना कुणापुढेही हात पसरण्याची वेळ येणार नाही. महागडी बियाणे, खते वापरूनही शेतमालास चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे, असे शेतकरी भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले.

नगदी पीक असलेल्या कापसाला भाव नाही..

शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहतात. त्यावरच अर्थचक्र अवलंबून असते; परंतु गेल्या वर्षीपासून कापसाला भाव मिळत नाही. पाच वर्षांपूर्वी कापसाला ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता, आता ७ हजार रुपये आहे.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

खताचे दर (प्रतिबॅग)

खतमागील वर्षीयंदा
डीएपी१३५० रुपये१३५० रुपये
२०:२०:१३१२५०१३५०
१०:२६:२६१४७०१७००
२४:२४:००१५५०१७००
सुपर फॉस्फेट ४८०५८०
बियाणे मागील वर्षीयंदा 
कॉटन (४५० ग्रॅम)८५३ रुपये८६४ रुपये 
मका (४ किलो)१३५०१६६०
तूर (१ किलो)१५०२५०
टॅग्स :शेतीशेतकरीपीकबाजार