नवी दिल्ली : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत ऑक्टोबर २०२५ पर्यंत २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय विद्युत व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी गुरुवारी केले.
औद्योगिक संघटना 'पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ने आयोजित केलेल्या वीज वितरण कंपन्यांच्या परिषदेत नाईक यांनी सांगितले की, 'पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना' ही सौर ऊर्जा क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठा पुढाकार आहे.
या योजनेत मार्च २०२७ पर्यंत १ कोटी घरांवर सौर ऊर्जाप्रणाली स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
येत्या मार्चपर्यंत घरांच्या छतावर सुमारे १० लाख, तर ऑक्टोबरपर्यंत २० लाख सौर ऊर्जा उपकरणे बसविली जाण्याची अपेक्षा आहे. मार्च २०२६ पर्यंत हा आकडा ४० लाखांवर जाईल.
नाईक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ७५,०२१ कोटी रुपयांच्या तरतुदीसह ही योजना सुरू केली.
अधिक वाचा: मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा