Join us

pink e-rickshaw scheme : पिंक ई-रिक्षा योजनेतून महिलांना मिळणार अर्थसाहाय्य; असा करा अर्ज वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:00 IST

पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींच्या रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना काम करत आहे. (pink e-rickshaw scheme)

अमरावती : महिला व बालविकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. या योजनेत राज्य शासनाकडून २० टक्के अनुदान मिळणार आहे तसेच ६०० महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींच्या रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कंपनी देणार प्रशिक्षण

ई-रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना, परमिट, बेंच बिल्ला, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज

योजनेत ई-रिक्षाच्या किमतीमध्ये जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खासगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला मुली यांना १० टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षे मुदत राहणार आहे.

असा करा अर्ज

* अर्जदाराचे वय २० ते ४० वर्षे असावे.

* लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

* योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

* विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्रप्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशितांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ एकदाच

दारिद्ररेषेखालील महिलांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा, महिला कर्ज घेण्यास पात्र असावी, परतफेडची जबाबदारी महिलेची राहणार आहे.

येथे करावा लागेल अर्ज

या योजनेसाठी महिला व बालविकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, समाज विकास अधिकारी महानगरपालिका, अमरावती, कार्यक्रम व्यवस्थापक, नरेगा, जिल्हा परिषद अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण, गटविकास अधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपालिका, नगर पंचायत, लोक संचालित समूह साधन केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, अमरावती याठिकाणी अर्ज करता येणार आहे.

योजनेसाठी महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे आणि जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले आहे.

ही लागतील कागदपत्रे

लाभार्थीना योजनेसाठी अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचा तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, महिला स्वतः रिक्षा चालवण्याचे हमीपत्र, महिलेचे बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र, अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारी योजनासरकारअमरावतीऑटो रिक्षामहिलामहिला आणि बालविकास