Join us

तुरीचे बियाणे सदोष निघाले; शेतकऱ्याला ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 9:12 AM

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

तूर बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी दाखल प्रकरणात बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जय भगवान अ‍ॅग्रो ट्रेडर्स व महाबीज महामंडळाला दंड ठोकला आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई, खर्चापोटी एकूण ७० हजार रुपये देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी २०२०- २०२१ या हंगामासाठी अंबड येथील जय भगवान अ‍ॅग्रो ट्रेडर्समधून महाबीजचे तूर बियाणे खरेदी केले. त्यांनी शेतात तुरीचा पेरा केला होता मात्र, ते बियाणे उगवले, पण कंपनीने ठरवून दिलेल्या मुदतीत सदर तुरीच्या पिकास शेंगा लगडल्या नाहीत.

त्यामुळे शेतकरी विश्वंभर टकले यांनी कृषी विक्रेते जय भगवान अ‍ॅग्रो ट्रेडर्स, अंबड यांच्याकडे संपर्क करुन तक्रार केली. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टकले यांनी गेवराई येथील तालुका कृषी कार्यालयास रितसर तक्रार केली. या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी एक समिती नेमली.

समितीने शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता ९०% शेंगा लगडलेल्या नसल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिला. या अहवालाआधारे शेतकरी टकले यांनी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. अंबड येथील कृषी विक्रेते जय भगवान अ‍ॅग्रो ट्रेडर्स व महाबीज कंपनी, महाराष्ट्र स्टेट सीड्स कॉर्पोरेशन लि. या दोघांविरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली.

आयोगाचे अध्यक्ष हरीश अडके, सदस्या सतिका शिरदे यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांच्या तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार ९०% टक्के बियाणे कमी प्रतीचे होते, असा निष्कर्ष निघल्यामुळे तक्रारदार शेतकरी विश्वंभर टकले यांच्या बाजूने निकाल देण्यात आला.

अ‍ॅड. नरेंद्र कुलकर्णी यांचा युक्तिवाद व मांडलेला मुद्दा या प्रकरणी महत्त्वपूर्ण ठरला. यात महाबीज महामंडळाने व जय भगवान अ‍ॅग्रो ट्रेडर्स अंबड यांनी तक्रारदार शेतकरी विश्वंभर टकले यांना नुकसान भरपाई ६० हजार रुपये, शारीरिक व मानसिक त्रासासाठी ५ हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला आहे.

या आदेशापासून ४५ दिवसांत ही रक्कम न दिल्यास ८ टक्के व्याज आकारल्या जाईल असेही त्यात नमूद आहे. शेतकऱ्यांच्या बाजुने अ‍ॅड. नरेंद्र कुलकर्णी यांनी काम पाहिले.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :तूरशेतकरीग्राहकोपयोगी वस्तूशेतीबीड