Join us

पाकिस्तानचा 'तो' निर्णय भारताच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 5:01 PM

भारतीय केळीला या निर्णयामुळे फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : सध्या राज्यातील केळी निर्यात चांगल्या पद्धतीने सुरू असून दररोज साधारण ८०० टन केळीची निर्यात होत आहे. या केळीला १५ ते १७ रूपये किलोप्रमाणे दर मिळताना दिसत आहे. आखाती देशात मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जाते. यातच पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि इराणमध्ये केळीची निर्यात बंद केली असून याचा फायदा भारतीय केळी उत्पादकांना होणार आहे.

दरम्यान, मागच्या दहा वर्षाच्या  तुलनेत सध्या भारताची केळी निर्यात ही १० पटीने वाढली आहे. त्यातच यंदाची निर्यात ही दोन हजार टनांवर जाण्याची शक्यता सध्या आहे. महाराष्ट्रातून जळगाव, धुळे, सोलापूर, नंदुरबार या जिल्ह्यात सर्वांत जास्त  केळीचे उत्पादन घेतले जाते. तर आंध्रप्रदेशमधूनही केळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. राज्याचा विचार केला तर सोलापुरातील केळीला जळगावच्या केळीपेक्षा जास्त दर मिळतो.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात केळीचे उत्पादन कमी झाले असून पंजाब प्रांतातील लोकल मार्केटमध्ये केळीचे दर वाढले आहेत. त्यातच रमजानच्या महिन्यामुळे केळीला जास्त मागणी आणि आवक कमी असल्याने पाकिस्तानने केळी निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे येथील केळी अफगाणिस्तान आणि इराण या देशात जाणार नाहीत. या निर्यातबंदीचा भारतीय केळी उत्पादकांना होणार असल्याची माहिती आहे. 

असा होणार शेतकऱ्यांना फायदा?आखाती देशांमध्ये रमजानच्या महिन्यात केळीला चांगली मागणी असते आणि त्यातच पाकिस्तानने इराण आणि अफगाणिस्तान देशात होणारी निर्यात बंद केली. तर जगातील सर्वांत जास्त म्हणजे ७० टक्के केळी निर्यात करणाऱ्या इक्वेटर या देशातही रोगामुळे केळीचे उत्पादन कमी आहे. तर भारतातून केळीची निर्यात सुरू आहे. आंतरराष्ट्रीय  पातळीवरील या घडामोडींमुळे भारतीय केळीचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर वाढल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. 

कुठल्याही देशाने असा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा भारताला होत असतो. तर मागच्या सात ते आठ वर्षाच्या तुलनेत भारताने केलीच्या निर्यातीमध्ये १० पटीने वाढ केलेली आहे. मागच्या वर्षात भारताने ३ लाख ६१ हजार मेट्रीक टन केली निर्यात केली. दरम्यान, इक्वेटर देशातून जगभरातील ७० टक्के निर्यात होते. पण यंदा तेथील केळीवर रोग आल्यानंतर त्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारतीय केळीला फायदा होत असून पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयाचा केळी उत्पादकांना फायदा होईल.- सतिश वराडे (निर्यात व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकेळी