Join us

कांदा काढणी सुरू; मात्र शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 2:25 PM

फेब्रुवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व धुक्यामुळे कांदा पिकांवर थ्रीप्स, बुरशी अशा बऱ्याच रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते.

इतर पिकांपेक्षा अधिक आर्थिक लाभ होईल, या आशेवर यंदा गल्लेबोरगाव परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा पिकाला पसंती दिली आहे. सध्या या पिकाची काढणी सुरू झाली आहे; मात्र अपेक्षित खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यावर्षी खरीप हंगामातील काही पिकांनी शेतकऱ्यांना दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार कांदा पिकावर होती. तसेच गल्लेबोरगाव परिसरात यंदा कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा पिकांवर जास्त खर्चही केला होता; मात्र फेब्रुवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व धुक्यामुळे कांदा पिकांवर थ्रीप्स, बुरशी अशा बऱ्याच रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. तसेच या पिकावर अवकाळी पावसासह धुक्यामुळे इतर रोगांचाही प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना फवारणीवर जास्त खर्च करावा लागला. त्यातच उत्पन्नातही घट आली आहे. सध्या काढणी सुरू आहे, मात्र बाजारात भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

एकरी ४० हजारांच्या जवळपास खर्च

आधीच खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या आशेने कांदा पिकावर जास्त खर्च केला. हा खर्च एकरी सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत झाला आहे. त्यात पाण्याचेही ताडन पडले.

यावर्षी सुरुवातीला कांदा पीक जोमात होते. त्यामुळे उत्पादनाच्या आशेने त्यावर खर्च अधिक केला. मात्र रोगराई, पाण्याची कमतरता तसेच आता काढणीच्या वेळी कांदा पिकाच्या शेंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यात मजुरीही वाढलेली असून, कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे.- सतीश खोसरे, शेतकरी, गल्लेबोरगावपरिणामी नेहमी शंभर ते सव्वाशे क्विंटल एकरी होणारे कांदा उत्पादन यंदा अर्धे घटून ५० ते ६० क्विंटलपर्यंत आले आहे. सध्याचा भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने कांदा पेरा वाढलेला आहे. मात्र, शेंडअळीने उत्पादनाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकांवर संकटाची मालिका सुरूच असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. - किशोर बोडखे, शेतकरी,गल्लेबोरगाव

टॅग्स :कांदाबाजारशेती