Join us

ना जास्त पाणी, ना पैसा, चियाची शेती फायदेशीर कशी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:10 IST

रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना पर्याय म्हणून शेतकरी चिया पिकाकडे वळू लागले आहेत.

रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना पर्याय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी आता चिया पिकाकडे वळू लागले आहेत. पानावर केस असल्याने वन्यप्राण्यांचा या पिकाला धोका नसतो. पिकाने यंदा शेतकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली असून, कृषी विभागाच्या नियोजनात हे पीक नसतानाही जिल्ह्यात यंदा तब्बल 873 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे.

चिया पिकाला सुपर फूड मानले जाते. हे प्रामुख्याने फुलांचे रोप आहे. चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षापासून चिया पिकाची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागांत शेतकरी त्याची लागवड करतात. हळूहळू त्याचा विस्तार इतर राज्यांतही होत असून, आता वाशिम जिल्ह्यातील शेतकरीही या पिकाकडे वळू लागले आहेत. अधिक नफा आणि कमी खर्चामुळे चिया बियाणांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

पिकाचा कालावधी 115 दिवस

चियाचे पीक 110 ते 115 दिवसांत तयार होते. चिया बियाणे लागवडीसाठी सिंचनाची विशेष गरज नसते. पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन चिया बियाण्यांच्या लागवडीसाठी अधिक चांगली मानली जाते. तसेच चिया लागवडीतून एक एकरात सरासरी 5 ते 6 प्रति क्चिटल उत्पादन घेता येते, असे शेती करणारे शेतकरी सांगतात. शेतकयांना वा पिकासाठी बियाणे आणि औषधी देऊन कंपन्या उत्पादित चिया बियाणे 16 हजार रुपये प्रति क्चिटल दराने खरेदी करतात.

शेतकरी काय म्हणतात? 

चियाचे पीक कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे आहे. या पिकासाठी पाण्याची फारशी गरज नसते, शिवाय वन्यप्राण्यांचाही धोका नसतो. कंपनी बियाणे आणि औषधी उपलब्ध करून देत आणि उत्पादित बियाणेही खरेदी करते. मी एक हेक्टरवर या पिकाची पेरणी केल्याचे शेतकरी भागवत राऊत  यांनी सांगितले. चिया हे कमी पाण्यात येणारे आणि कमी खर्चाचे पीक आहे. साधारणतः तीन महिन्यात हे पीक हाती येते. यंदा एक एकर शेतात या पिकाची पेरणी केली असून, पिकाची स्थिती अगदी उत्तम असल्याचे शेतकरी रामभाऊ छापवाल यांनी सांगितले.

वन्यप्राण्यांचा धोका नाही

चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो. याच्या पानांवर केस वाढतात. यामुळे वन्यप्राणी त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचवत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. हे पीक उपटून काढले जाते. यानंतर वाळवून मळणी केली जाते. शिवाय चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगतात. लागण केल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांनी कंपन्यांना दिली तर त्यांचे एजंट शेतातून खरेदी करतात. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीपीकशेती क्षेत्र