Join us

परभणी कृषी विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास राष्‍ट्रीय पुरस्‍कार

By बिभिषण बागल | Updated: September 15, 2023 19:57 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार रायपुर (छत्तीसगड) येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात संपन्‍न झालेल्‍या तेलबिया पिकांच्या वार्षिक सभेमध्ये प्रदान करण्‍यात आला. सदर पुरस्‍कार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक (तेलबिया) डॉ. संजय गुप्ता यांच्या हस्ते परभणी कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांना प्रदान करण्यात आला. 

सदर करडई संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने आतापर्यंत अधिक उत्पादन देणारे दर्जेदार करडईचे वाण विकसित आणि प्रसारीत केलेले आहेत. यामध्ये शारदा, परभणी कुसुम (पीबीएनएस -१२), परभणी ४०, परभणी ८६ (पूर्णा), परभणी सुवर्णा (पीबीएनएस-१५४), पीबीएनएस-१८४ या वाणांचा समावेश आहे. परभणी कुसुम हा वाण राष्ट्रीय स्तरावर तुल्यबळ वाण म्हणून मागील १५ वर्षापासून संशोधनामध्ये वापरला जातो तसेच हा वाण देशभर शेतकरी बांधवामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.

या संशोधन केंद्राने १०० टक्के यांत्रिकीकरणाच्या संशोधन शिफारशीच्या माध्यमातून करडईचे मध्यवर्ती प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन केलेले आहे. या केंद्राने केलेल्या संशोधन व विस्ताराच्या कार्यामुळे करडई उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशभरात अग्रेसर आहे. या सर्व बाबींची दखल घेत २०१७ ते २०२१ या कालावधीत केलेल्या संशोधन कार्यासाठी भा.कृ.अ.नु.प.- भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैद्राबाद यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेने यांच्या मूल्यांकनाच्या आधारे करडई संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी ला उत्कृष्ट तेलबिया संशोधन केंद्र पुरस्कार देऊन गौरविले आहे. 

याबद्दल पुरस्‍काराबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांनी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शामराव घुगे व केंद्रातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतांना  म्‍हणाले की, तेलबिया पिकात करडई हे महत्‍वाचे पिक असुन विद्यापीठाच्‍या अनेक करडईचे वाण शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात प्र‍चलित आहेत, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे. सदरील पुरस्कार मिळविण्यासाठी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. 

टॅग्स :वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीहैदराबाद