सॉफ्टवेअर चाचणीला विलंब झाल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा पहिला हप्ता राज्यातील ८६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही.
'नमो' योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा सरकारने केली. या योजनेचे कार्यान्वनासाठी महाआयटीने सॉफ्टवेअर तयार केले. मात्र, अंतिम चाचणी न झाल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजारांचा पहिला हप्ता जमा झालेला नाही.
केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी 'पीएम-किसान'चे निकष आणि संगणकीय माहिती 'नमो किसान'साठी वापरा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या. त्यामुळे महाआयटीकडून संगणकीय प्रणाली तयार झाली.