Join us

Mango Export : हापूस, केशर आंबा निर्यातीचा श्रीगणेशा! यंदाची पहिलीच पेटी युरोपात दाखल

By दत्ता लवांडे | Updated: March 25, 2025 13:02 IST

यंदा जीआय मानांकन मिळालेल्या हापूस आंब्याला आता युनिक आयडी कोड देण्यात येणार असल्यामुळे यामधील भेसळ आणि फसवणूक थांबण्यात मदत होणार आहे. 

Pune : यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आणि केशर आंब्याची पेटी युरोपीय बाजारात दाखल झाली आहे. ही महाराष्ट्रातील केशर आणि हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. युरोपीय बाजारपेठांमध्ये असलेल्या रेसिड्यू आणि इतर मानांकनाचे काटेकोरपणे पालन करून ही शिपमेंट पूर्ण करण्यात आली आहे. 

कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कुलदरा गोनावाडी येथील सुरज काळे या शेतकऱ्याचा ३४० किलो केशर आंबा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील प्रितेश साळवी या शेतकऱ्याचा अंदाजे ६४० किलो हापूस आंबा वेंकटरमण इंटरनॅशनल यांनी एकरत या ब्रँडच्या नावाने युरोपात पाठवला आहे. 

येणाऱ्या काळात आंब्याची आवक जशीजशी वाढेल तशी निर्यात वाढणार आहे. यासोबतच यंदा जीआय मानांकन मिळालेल्या हापूस आंब्याला आता युनिक आयडी कोड देण्यात येणार असल्यामुळे यामधील भेसळ आणि फसवणूक थांबण्यात मदत होणार आहे. 

मँगोनेट प्रणालीव्‍दारे शेत नोंदणी भारतातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन हे महाराष्ट्रात होत असून जे शेतकरी निर्यातक्षम आंबा उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागांची आणि शेतीची नोंदणी मँगोनेट प्रणालीव्‍दारे करून घेतली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार देशात एकूण २३ हजार १५७ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी केली आहे. पण त्यातील १७ हजार ६९१ शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी ७६ टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातील ६ हजार ९९६ शेतकरी हे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. 

राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असून येणाऱ्या काळात जसजशी आंब्याची आवक वाढेल तशी निर्यात वाढेल. प्रत्येक देशांच्या मानांकनाचे काटेकोरपणे पालन करून निर्यात करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.- कैलास मोते (फलोत्पादन संचालक)

टॅग्स :आंबाशेतकरीशेती क्षेत्र