Join us

तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल! उभ्या पिकात सोडली जनावरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 12:42 PM

तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याने थेट हरभऱ्याच्या शेतात चारली जनावरे

बुलढाणा : हरभऱ्यामध्ये उगवलेल्या सोयाबीनच्या तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील हरिभाऊ येवले या शेतकऱ्याने एक प्रयोग केला असून थेट शेतात शेळ्या चारण्यासाठी सोडल्या आहेत. सोयाबीन निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी शेतात हरभऱ्याची पेरणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे तण उगवले आहे. हे तण काढण्यासाठी मजुरांचा वापर न करता शेतकऱ्याने ही शक्कल लढवली आहे. 

हरभऱ्याच्या झाडावर आम्ल असल्यामुळे शेळ्या हरभरा पिकाला खात नाहीत. तर हरभऱ्याच्या तुलनेत सोयाबीनचे झाड शेळ्या खातात. त्यामुळे हरभऱ्याच्या शेतातील तणव्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत नाही. पण जर जास्त प्रमाणात शेळ्या शेतात सोडल्या अन् सोयाबीनचे तण कमी पडले तर शेळ्या हरभऱ्याचे पीकही खातात हा शेतकऱ्याचा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने चार ते पाच शेळ्या सोडून हा प्रयोग अगोदर करून पाहावा आणि त्यानंतर जास्त प्रमाणात शेळ्या शेतात सोडाव्यात असं शेतकरी हरिभाऊ येवले यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, कोणत्याही पिकातील तण व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी तणनाशक किंवा खुरपणी करावी लागते. तर खुरपणी करण्यासाठी मजुरांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे हे तण व्यवस्थापन शेतकऱ्यांना महागाचे ठरते. तर हरभऱ्याच्या शेतात शेळ्या चारल्यामुळे होणारे तणव्यवस्थापन हे विनाखर्ची आणि सोप्पे असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. फक्त शेळ्या चारण्यासाठी सोडल्यावर त्या हरभरा खात नाहीत याकडे लक्ष द्यायचे आहे. कारण शेळ्या जास्त असतील तर त्यांच्यात स्पर्धा लागून त्या आम्ल असलेल्या हरभऱ्याचे पिकही खातात असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

बकरीने खाल्लेली सोयाबीनचे झाडे उपटली जात नाहीत. त्यामुळे ती अर्धवट राहतात आणि चुकून एखाद्या ठिकाणी शेळीने हरभरा खाल्ला तर त्याची खुडणी होते. ते पुढे हरभऱ्यासाठी फायद्याचेच ठरते.

कारण खुडणी केल्यानंतर हरभऱ्याला घाटे लागण्याचे प्रमाण वाढते. माझ्या शेतात एक व्यक्ती शेळ्या चारत असताना मला हा प्रकार कळाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी असा प्रयोग करायला सुरूवात केली. कोणत्याही शेतकऱ्याने असा प्रयोग करत असताना आधी निरीक्षण करावे आणि शेळ्या काय खातात ते पाहावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा. अन्यथा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

- हरिभाऊ येवले (शेतकरी-चिखली, बुलढाणा)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतकरी संपआयडिया