Join us

मधमाशीपालनातून उद्योजक व्हा आणि वाढवा शेतीचे उत्पादनही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 2:49 PM

परागीभवनाद्वारे शेती, पिके आणि फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात.

शेतीच्या उत्पादनाची वाढ ही मधमाशांवर अवलंबून आहे कारण मधमाशा अप्रत्यक्षपणे आपल्या पिकांच्या फुलोऱ्यातील परागसिंचनाने (परागीभवनाने), पिकामध्ये वाढ होण्यास फार महत्वाची मदत करतात. चांगली फळे झाडाला लागावी किंवा सुधारित, चांगल्या प्रतीचे पिक यावे याकरिता जे परागीभवन व्हावे लागते ते किटकांवर अवलंबून असते. जवळपास ८०% परागीभवन हे फक्त मधमाशी या किटकाद्वारे होत आहे. परागीभवनाद्वारे शेती, पिके आणि फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात.

मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळयाच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलामधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. परंतू मधमाश्यांना न जाळता कोणतीही इजा न पोहचवता तांत्रिक पद्धतीने मधुमक्षिका पालन केल्यास त्यामधून मध आणि इतर पदार्थ गोळा करून या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देता येऊ शकते. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक आधारित उद्योग म्हणून उदयास येत आहे. 

मधमाशीपालनाचे वैशिष्ट्ये आणि महत्त्व :-

१. एक नमुनेदार किफायतशीर ग्रामोद्योग

२. परागीभवनाद्वारे शेती, पिके आणि फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.

३. शुद्ध मधाचे उत्पादन, मेणाचे उत्पादन व इतर आधारीत वस्तुं सौंदर्य, प्रसाधने आणि औद्योगिक उत्पादनाचा महत्वपूर्ण घटक आहेत.

४. मधमाश्यांपासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली), , दंश विष ( (वी-व्हेनम), पराग (पोलन), रोंगण (प्रो-पोलीस) या पदार्थांना उच्च प्रतीचे औषधी मूल्य आहे.

५. मधमाशापालनाद्वारे मधमाश्यांचे संरक्षण, संवर्धन व वृद्धी होते.

६. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मधमाशापालन करणे गरजेचे आहे.

पेटीतील मधमाश्यांचे प्रकार-

  • राणी माशी- एक राणी माशी
  • नर माशी- २००-३००च्या संख्येने
  • कामकरी माशी- ४०,००० ते ६०,००० च्या संख्येने

मधमाश्यांच्या जाती-

• आग्या मधमाशा - Apis Dorsata

• सातेरी मधमाशा - Apis Cerana Indica

• मेलिफेरा मधमाशा - Apis Melifera

• फुलोरी मधमाशा - Apis Floria

• डंखविरहित मधमाशी- Stingless Bee(Trigona)

मधमाशापालन उद्योगाची विकासक्षमता

हा व्यवसाय छोट्या स्वरूपात सुरु करता येऊ शकतो फक्त 10 पेट्यांच्या मदतीने मधमाशापालनाचा व्यवसाय सुरु करून चांगल्या प्रकारचे मधुबन उभे करता येते. 10 पेठ्यांच्या मदतीने मधमाशापालन व्यवसायात एकूण खर्च 40,000 ते 50,000 पर्यंत येतो. दरवर्षी मधमाशांची संख्या वाढल्याने हा व्यापार 3 पटीने वाढतो. म्हणजेच 10 पेट्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय 1 वर्षात 25 ते 30 पेठ्यांचा होऊ शकतो अणि त्याकरिता मधपेट्या ज्या ठिकाणी चांगला फुलोरा आहे अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.

मधमाशापालनाचे स्वरूप 

आधुनिक पद्धतीप्रमाणे लाकडी पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या जातात. या पेटीत दोन दालने असतात. एक खालचे वंश संगोपनाचे दालन आणि दुसरे वरचे जादा मध साठवण्याचे दालन. दोन्ही पेटीत काढता येण्याजोग्या लाकडी चौकटी असतात. या लाकडी चौकटींमध्ये मधमाश्या मेणाची पोळी बांधतात. या पोळ्यामधून मधकाढनी यंत्राच्या सहाय्याने मध काढून घेतल्यानंतर रिकामी झालेली पोळी पुन्हा भरण्यासाठी त्या दालनात परत ठेवली जातात. भिन्न भिन्न मोसमानुसार मधमाशांच्या बसाहती योग्यरीतीने हाताळने गरजेचे आहे . उदारणार्थ, जेव्हा पावसाळ्यात किवा अन्य ऋतूत फुलोरा कमी पडतो अशावेळी मधमाशाना साखरेचा पाक देणे, वसाहतीचे स्थलांतर करणे इ. कामे करावी लागतात.

मधमाशापालनाचे साहित्य

नमुनेदार मधुपेटी, राणी-पिंजरा, मेणपत्रे, धूम्रक, पटाशी किंवा तत्सम चाकू, मधकाढनी यंत्र, कापडी जाळीचा बुरखा आणि हातमोजे इ.

मधमाशापालनाला सुरवात कशी करावी

सुरुवातीला ५-१० पेट्या व मधमाशांच्या वसाहती, एक मधकाढनी यंत्र, एक धूर टाकण्याचे यंत्र आणि काही किरकोळ संचात आपण सुरवात करू शकतात. एका पेटीची किंमत ३५००-४५००/- (सातेरी माशी - Apis cerana indica) किंवा ४०००-५०००/- (मेलिफेरा माशी - Apis melifera) रुपयापर्यंत असते. ही किंमत नियोजित क्षेत्रात योग्य असणाऱ्या नमुन्याची कोणती पेटी लागेल त्यावर अवलंबून असते. मधमाशा वसाहती जवळच्या जंगलातून सातेरी माशी - Apis cerana indica किंवा त्यांच्या संगोपन केंद्रातून मिळू शकतात. तसेच महाराष्ट्रातील किंवा आजूबाजूच्या राज्यातील मधपालकाकडे देखील वरील दोन्ही प्रकारच्या पेटी सहित वसाहती मिळू शकतात.

वसाहतींचे व्यवस्थापनः

मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळच्या तासांमध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून एकदा करावी. मधमाशांच्या पेटीतील पोळ, कोपरे आणि पोकळीतून सर्व अळया आणि रेशीमयुक्त जाळ्या काढून टाका. पोळ्याची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमँग्रेटमध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्यांनी स्वच्छ करा. जेव्हा पावसाळ्यात किवा अन्य ऋतूत फुलोरा कमी पडतो अशावेळी भारतीय मधमाश्यांसाठी (सेरेना प्रजातीसाठी) प्रति आठवडा प्रति वसाहत २०० ग्रॅम साखर या दराने साखर सीरप (१:१) द्या. आणि मेलिफेरा वसाहती साठी गरजेनुसार साखर सीरप देणे गरजेचे आहे.

मधमाशापालनासाठी योग्य क्षेत्रः

१. मधुपेट्या ठेवून मधुबन तयार करण्याची जागा ऊन, पाऊस, वारा व धूर यांपासून संरक्षित असावी.

२. मधमाशापालनासाठी स्वच्छ आणि नैसर्गिक, हवा, पाणी आणि जास्तीत जास्त झाडे असतील असे ठिकाण निवडावे जेणेकरून मधमाशाना जास्तीचा फुलोरा मिळेल.

3. एका बॉक्समध्ये जास्तीत जास्त 10 फ्रेम मधमाश्य असू शकतात, परंतु साधारणपणे 8 फ्रेम मधमाशा ठेवणे चांगले. त्यामुळे त्यांची काळजी घेणेही सोपे जाते.

४. कीटकनाशके, प्रदूषण, धूर इत्यादी क्षेत्रांपासून मधपेट्या दूर ठेवाव्यात (कीटकनाशके फवारणी वेळी योग्य ती काळजी घ्यावी.)

५. बदलत्या ऋतुंप्रमाणे पराग व मकरंद उपलब्ध होईल असे ठिकाण निवडावे. (माइग्रेटरी बीकीपिंग करीता - एका ठिकाणाहून दुसरीकडे वसाहती ठेवताना काळजी घ्यावी.)

६. माकडे, अस्वले, साप, बेडूक, पक्षी, मुंग्या आणि वाळवी या प्राण्यांपासून उपद्रव होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मधमाशापालना द्वारे पिकांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ (३०-३५%) प्रमाणात अधिक झालेली दिसून येते हा अप्रत्यक्ष झालेला फायदा कोणी लक्ष्यात घेत नाही. कितीही चांगल्या प्रकारचे बी - बियाणे, खते, जमिनीच्या निवडी प्रमाणे पिके घेतली आणि मधमाशा त्या भागामध्ये जर नसतील तर परपरागीभवन होणारच नाही झालेच तर ते खूप थोड्या प्रमाणात होईल. पुंकेसरामधील (male gamete) परागकण फुलाच्या स्त्रीकेसरावर (female gamete) वरती जाऊन पडणे फार महत्वाचे आहे तरच त्यांचे योग्य मिलन होऊन पुढील फळधारणा होण्यास मदत होईल आणि योग्य प्रमाणात होणारा मुबलक फायदा (marginal profit return) हा शेतकऱ्यालाच होईल त्यासाठी मधमाशापालना विषयी जागरुकता होणे फार गरजेचे आहे. जेवढा चांगला फुलोरा असेल तितके अधिक प्रमाणात वसाहती मजबूत बनतात आणि मधमाशाना न जाळता कोणतीही इजा न करता तांत्रिक पद्धतीने मधुमक्षिकापालन करणे गरजेचे आहे. त्याकरिता प्राथमिक दर्जाचे तांत्रिक पद्धतीचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

जर एखाद्या शेतकऱ्याला हा शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल तर केंद्रीय मधुमक्षिकापालन, संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, पुणे येथे प्रशिक्षण दिले जाते. अधिक माहितीसाठी प्रशिक्षण विभागाशी संपर्क साधावा - 8237421963

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीव्यवसायहनीप्रीत इंन्सा