सोलापूर : विमा कंपनीकडून २०२० व २०२१ या दोन वर्षांची मंजूर असलेली पीक नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही याची माहिती मिळावी, असे पत्र वडाळ्याच्या शेतकरी दीपाली मनोज साठे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पत्राला केराची टोपली दाखवणारी इंशुरन्स कंपनी जिल्हाधिकाऱ्यांना तरी जुमानते का, हा प्रश्न आहे. याबाबत अधिक माहिती अशी की २०२० खरीप व रब्बी तसेच २०२१ खरीप हंगामात विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान रक्कम मंजूर असूनही विमा कंपनीकडून पैसे मात्र दिले जात नाहीत.
जिल्हाातील १० हजाराहून अधिक असे शेतकरी आहेत की, त्यांना विमा नुकसानभरपाई रक्कम मंजूर आहे. मात्र विमा कंपनीने तीन वर्षांत रक्कम खात्यावर जमा केली नाही. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तोंडी अनेक वेळा विचारणा केली, मात्र पैसे कधी खात्यावर जमा करणार, याचे ठोस उत्तर कोणी दिले नाही.
२०२० व २०२१ या दोन वर्षात मंजूर नुकसानभरपाई शेतकऱ्यांची यादी, मंजूर रक्कम, शेतकऱ्यांनी भरणा केलेल्या रकमेची माहिती पत्रात जिल्हाधिकारी व अधीक्षक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
आम्ही कृषी खात्याच्या आवाहनानुसार पिकांची रक्कम २०२० व २०२१ या दोन वर्षात विम्यापोटी भरली आहे, विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मंजूर यादीत आमची नावेही आहेत, मात्र तीन वर्षांनंतरही विमा कंपनी पैसे देत नाही. महाराष्ट्र शासन व विमा कंपनी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागायचा आहे. त्यासाठी माहिती मागितली आहे. - दीपाली मनोज साठे, शेतकरी, वडाळा
अधिक वाचा: PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल