Join us

Leopard Attack: शेतकऱ्याचा नाद नाय करायचा, बिबट्या नडला म्हणून शेतकऱ्याने त्याला फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 4:14 PM

शेतकऱ्याच्यावर हल्ला करणे बिबट्याला चांगलेच महागात पडले आहे. शेतकऱ्यांने हिम्मत न हारता बिबट्याचा सामना केला.

शेतात, गावात आणि घराजवळही बिबट्या दिसण्याचे प्रमाण अलीकडे खूपच वाढले आहे. राज्यातील जुन्नर, निफाड यासारख्या ऊसाच्या पट्ट्यात बिबट्यांनी शेतकऱ्यांना खूपच हैराण केलेले आहे. एकूणच मानव आणि बिबट्या हा संघर्ष आता वाढत आहे. अनेक शेतकरी आपल्या अक्कल हुशारीने आणि प्रसंगावधान राखल्याने बिबट्याच्या तावडीतून बचावलेही आहेत.

असाच प्रसंग नुकतास शेतात काम करून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत घडला आहे. मात्र या शेतकऱ्यांने हिम्मत न हारता बिबट्याशी झुंज दिली. त्याने त्याच्या तोंडावर असा काही ठोसा मारला की बिबट्याने धूम ठोकली.

नैनिताल जवळ असलेल्या पेरुमदरा भागातील भवानीपूर पंजाबी येथील हा शेतकरी रहिवासी आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.भवानीपूरचे दारा सिंग (४६) हे संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ते शेतात काम करून घरी परतत होते. 

घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असताना वाटेवर पुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. 

बिबट्याने हल्ला करताच त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला. या सगळ्यात हिंमत न हारता शेतकऱ्याने बिबट्याच्या जबड्यावर जोरात ठोसा मारला. ठोसा इतका जोरात होता, की त्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला.

शेतकऱ्याने आपल्या घरच्यांना याबाबत कळविल्यावर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या शेतकऱ्याच्या उजव्या हातावर बिबट्याच्या चाव्याच्या खुणा आणि मानेवर नखांच्या खुणा आहेत. दरम्यान घटनास्थळी गस्त वाढवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली असून पिंजरा बसविण्याची कारवाई सुरू आहे.

टॅग्स :बिबट्याशेतकरी