Join us

Salokha Scheme : सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ, एक हजारांत दस्तनोंदणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 8:45 PM

शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपसातील वाद मिटविण्यासाठी राज्यात सलोखा योजना राबविण्यात येत आहे.

बुलढाणा : शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपसातील वाद मिटविण्यासाठी राज्यात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. परस्परांमधील शेतजमिनीचा ताबा परत मूळ मालकाकडे करण्यासाठी या सलोखा योजनेतून नाममात्र एक हजार रुपयांत दस्त नोंदणी होणार आहे.

शेतजमिनीच्या वहिवाटीवरून वाद होतात. यावर उपाययोजना म्हणून हे वाद मिटविणे आणि समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सलोखा योजना प्रभावी ठरणार आहे. यामुळे एकमेकांमधील सौख्य आणि सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिनी धारकांचे अदालाबदल सलोखा योजना दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रूपये आणि नोंदणी शुल्क एक हजार रूपये आकारण्याचा निर्णय ३ जानेवारी २०२३ पासून घेण्यात आला आहे.

सलोखा योजनेमुळे शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन अदलाबदल नंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाइपलाइन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकणार आहे. शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे अनेक शेतजमीन पडीत राहते. लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. सलोखा योजना राबविली तर अशा परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयांतील प्रकरणे निकाली निघणार आहेत. 

दोन वर्षापर्यंत योजना लागूही योजना दोन वर्षापर्यंत लागू राहणार आहे. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी आणि ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी करून दस्त नोंदणीच्या वेळी दस्तसोबत जोडणे बंधनकारक आहे. जमिनीच्या दोन्ही बाजूंकडील क्षेत्रफळात कितीही फरक असला तरी योजनेत पात्र मात्र दोन्ही पक्षकार सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत असल्याची अट दस्तामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाजिल्ह्यातील शेतजमीन मालकी हक्काबाबत होणारे वाद कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वाद मिटवून सामाजिक सौख्य आणि सौहार्द वाढविण्यास हातभार लावावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :शेतीशेतकरीशेती क्षेत्र